कोकणात विकासकामांना स्थगिती नाही ,पण...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

राज्यात  फेरआढावा घेत असताना कोठेही प्रगतीला बाधा येणार नसून सिंधुदुर्गातही अनेक कामे पुढील काही दिवसात हाती घेण्यात येणार आहेत

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्गच काय , कोकणातील कोठेही मंजूर विकासकामांना स्थगिती दिलेली नाही . त्यांचा केवळ फेरआढावा घेतला जाईल , असे माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे स्पष्ट केले . 

येथील श्रीधर अपार्टमेंटमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते . नव्या सरकारने कार्यारंभ आदेश देण्यात न आलेल्या विकासकामांना स्थगिती दिल्याचा आरोप होत आहे. 
यावरील प्रश्‍नावर ते म्हणाले, जिल्ह्यातच काय संपूर्ण महाराष्ट्रात कोठेही मंजूर असलेल्या विकासकामांना स्थगिती देण्यात आलेली नाही'. या सर्व कामांचा फेरआढावा घेण्यात येत आहे . नुकतेच नवीन सरकार स्थापन झाले आहे .

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निधी येणार

त्यामुळे कामे मार्गी लावण्याआधी पुन्हा एकदा या विकासकामांचा फेरआढावा घेण्याचे काम सुरू आहे . राज्यात हा फेरआढावा घेत असताना कोठेही प्रगतीला बाधा येणार नसून सिंधुदुर्गातही अनेक कामे पुढील काही दिवसात हाती घेण्यात येणार आहेत . मुख्यमंत्री ठाकरे यांच्या माध्यमातून या जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात निधी येणार आहे.'

 हेही वाचा - जलसिंचनाच्या प्रकल्पावर काय म्हणाले माजी जलसंपदामंत्री

नगराध्यक्ष बिनविरोध होण्यासाठी प्रयत्नशील

पालिकेच्या नगराध्यक्ष पदाबाबत ते म्हणाले, 'येथील पालिकेचा नगराध्यक्ष बिनविरोध व्हावा , अशी इच्छा आहे . नगराध्यक्ष उमेदवार निवडीबाबत येथे महाविकास आघाडीच्या पक्षांची बैठक होणार आहे . या तिन्हीही पक्षांना विश्‍वासात घेऊनच पालिकेचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार ठरविण्यात येणार आहे . येथे विरोधकांची ताकद कमी असल्याने त्यांनी निवडणुकीत नाहक उमेदवार उभा करून लोकांचा वेळ आणि शासनाचा पैसा घालवू नये. नगराध्यक्ष बिनविरोध होण्यासाठी प्रयत्नशील आहे.'

 हे नक्की वाचा -  न्याय कोर्टांच्या माध्यमातून मिळाला असता तर बरं वाटलं असते - विजया रहाटकर
 

मुख्यमंत्र्यांचे कोकणावर फार प्रेम

 'मुख्यमंत्री ठाकरे यांचे संपूर्ण राज्यावर विशेषतः कोकणावर फार प्रेम आहे. ते स्वतः मुख्यमंत्री असल्याने निर्णय घेण्यास सक्षम आहेत. शांत व संयमी असे त्याचे व्यक्तिमत्त्व असले तरी ते शिवसेनेचे वाघ आहेत. आपल्या ट्‌वीटमुळे त्यांनी नाणार प्रकरणातील गुन्हे मागे घेतल्याचे काही जण त्यांच्याबद्दल गैरसमज करीत आहेत.'
 
 जठारांच्या टीकेला प्रत्युत्तर 

शिवसेनेची प्रतिष्ठा 'सिल्वर ओक' बंगल्यावर गहाण ठेवली असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, 'शिवसेना हा मराठी माणसाच्या अस्मितेसाठी आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी झगडणारा पक्ष आहे, हे सर्वश्रुत आहे. शिवसेना संपविण्याचा प्रयत्न कोणी केला हे जठारांना माहीतच आहे. भाजपसारख्या पक्षाने आपल्या मित्रपक्षालाच संपविण्याचा विचार केला होता.

मराठी माणूस पंतप्रधान होण्यासाठी तयार

मराठीला दुय्यम स्थान मिळू नये. मराठीची अस्मिता कायम राहावी यासाठीच राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. शरद पवार हे पंतप्रधानपदासाठी तयार असतील तर (कै.) बाळासाहेब ठाकरे यांनी एक मराठी माणूस पंतप्रधान होण्यासाठी सर्व खासदार त्यांना पाठिंबा देण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे जठार यांच्या वक्तव्यांना काही अर्थ नाही. त्यांच्याशी वाद घालण्यास वेळ नाही.'

 मुख्यमंत्री ठाकरे स्वतः निर्णय घ्यायला सक्षम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे वाघ आहेत. ते स्वतः निर्णय घ्यायला सक्षम आहेत. नाणार प्रकल्पग्रस्तावरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय कोणाचे ट्विट बघून घेतलेला नाही. यावरून असे सांगता येते, की मालक स्वतः बैलगाडी चालवत असतो त्या बैलगाडीखाली तो एका कोकराला बांधतो ; मात्र त्या कोकराचा गैरसमज होतो , की आपणच बैलगाडी चालवत आहोत. 
- दीपक केसरकर, आमदार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Konkan Development Works, But ...