अप्पासाहेब पटवर्धन यांच्या मॉडेलचा वापर जगभरात 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 August 2019

कोकणचे गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांनी पन्नास वर्षापूर्वीच शौचालयाची विविध मॉडेल तयार केली होती. याच मॉडेलचा वापर आज जर्मनीसारख्या प्रगत देशात होतोय.

- नीतेश राणे

कणकवली - कोकणचे गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांनी पन्नास वर्षापूर्वीच शौचालयाची विविध मॉडेल तयार केली होती. याच मॉडेलचा वापर आज जर्मनीसारख्या प्रगत देशात होतोय. महात्मा गांधींचे अनुयायी असलेल्या अप्पासाहेबांची कणकवलीत येऊन झाडू हातात घेतला. चलनशुद्धीचा सिद्धांत मांडला. श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली. शेतीचे अनेकविध यशस्वी प्रयोग केले. कणकवलीला जगभरात नाव मिळवून देणाऱ्या या अप्पांच्या कर्मभूमीत त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्याचा मनोदय आज पूर्ण झाला, याचे खूप मोठे समाधान आपणाला आहे, असे प्रतिपादन आमदार नीतेश राणे यांनी येथे केले. 

येथील प्रहार भवन येथे कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांचा पूर्णाकृती पुतळा नगरपंचायतीला प्रदान कार्यक्रम झाला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र मुंबरकर, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, पंचायत समिती सभापती सुजाता हळदीवे, डॉ. मिलिंद कुलकर्णी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाई खोत, अशोक करंबेळकर, शिल्पकार जयदीप, मुख्याधिकारी अतुल पिंपळे आदी उपस्थित होते.

श्री.राणे म्हणाले, खेडी समृद्ध झाली तर, प्रत्येकाच्या हाताला काम मिळेल, याउद्देशाने महात्मा गांधींनी खेड्याकडे चला, असा मंत्र दिला. त्यानंतर अप्पासाहेब पटवर्धन कणकवलीत दाखल झाले. त्यांनी गडनदीकाठी आश्रम उभारला, एवढेच नव्हे तर दररोज हातात झाडू घेऊन मैला साफ करण्याचे काम सुरू केले. गोपुरी आश्रम अनेकविध प्रयोगांचा आगर बनवला. स्वच्छतेबाबतचे त्यांचे प्रयोग आजही भारतासह संपूर्ण देशात अनुकरणीय ठरले. श्रमाबरोबर वैचारिक मशागतीचेही काम त्यांनी केले. चलनशुद्धीचा सिद्धांतही मांडला. अप्पासाहेबांच्या विचारांचा हा वारसा आजच्या पिढीने पुढे चालवायला हवा. त्यांचे विचार समजून घ्यायला हवेत. 

राणेंमुळेच नगरपंचायतीला भरघोस निधी 
आमदार नीतेश राणे यांच्यामुळेच कणकवली नगरपंचायतीला 15 कोटींचा भरघोस निधी उपलब्ध झाला आहे. यानिधीमधून अद्ययवात गार्डन, स्टेडियम आदी कामे केली जाणार आहेत. तसेच नगरपंचायतीच्या उद्यानात अप्पासाहेबांचा पुतळा बसविणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Konkan Gandhi Appasaheb Patvardhan Toilet model used in world