31 वर्षांनंतर तेजाळली "ज्योती' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 जून 2017

गुहागर - तीन तपापूर्वी दहावीच्या परीक्षेत गणितात अनुत्तीर्ण झाल्या तरी शिक्षणाची आस संपली नव्हती. 31 वर्षांनंतर पुन्हा दहावीची (मार्च 2017) परीक्षा देऊन गणितात उत्तीर्ण होण्याची किमया वेळंब येथील ज्योती प्रकाश जाधव यांनी 48 व्या वर्षी केली. प्रापंचिक अडचणी, दु:खावर मात करीत दहावी उत्तीर्ण झाल्याचा आनंद त्या आज लुटत आहेत. 

गुहागर - तीन तपापूर्वी दहावीच्या परीक्षेत गणितात अनुत्तीर्ण झाल्या तरी शिक्षणाची आस संपली नव्हती. 31 वर्षांनंतर पुन्हा दहावीची (मार्च 2017) परीक्षा देऊन गणितात उत्तीर्ण होण्याची किमया वेळंब येथील ज्योती प्रकाश जाधव यांनी 48 व्या वर्षी केली. प्रापंचिक अडचणी, दु:खावर मात करीत दहावी उत्तीर्ण झाल्याचा आनंद त्या आज लुटत आहेत. 

ज्योती जाधव या मार्च 1986 मध्ये दहावीला गणितात उत्तीर्ण होऊ शकल्या नाहीत. परीक्षेनंतर लगेचच विवाह झाल्याने दहावी उत्तीर्ण होण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्णच राहिले. संसार सुरू झाला; दोन मुले झाली. त्यांचे पती प्रकाश जाधव कृषी सहायक म्हणून सरकारी नोकरीत होते. फेब्रुवारी 2006 मध्ये अल्पशा आजाराने प्रकाश जाधव यांचे निधन झाले. सरकारने अनुकंपावर नोकरी देऊ केली; मात्र लहान मुलांकडे लक्ष देण्याची गरज असल्याने दोन वर्षे थांबण्याची विनंती ज्योती जाधव यांनी केली. सरकारनेही ते मान्य केले. त्यानंतर 2008 मध्ये कृषी कार्यालयात शिपाई म्हणून ज्योती जाधव काम करू लागल्या. 

दहावी उत्तीर्ण व्हायचे ही आस होती; पण कसे असा प्रश्‍न होता. कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी प्रोत्साहन दिले. कार्यालयाशेजारी असलेल्या गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरमधील शिक्षकांनी सहकार्य केले; त्यांना शिकविले. तसेच वाडीतील दहावीला असलेली मुले-मुलीदेखील "ज्योती मामीं'ना शिकवायला पुढे सरसावली. शाळेत मिळणाऱ्या प्रश्नपत्रिका मुलांनी जाधव यांच्याकडून सोडवून घेतल्या. गणिते कशी सोडवायची हे दाखविले. या साऱ्या मागदर्शनामुळे मार्च 2017 च्या दहावीच्या परीक्षेत ज्योती जाधव गणितात 62 गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या. 

नोकरीची दहा-बारा वर्षे शिल्लक आहेत. दहावी उत्तीर्ण व टायपिंग झाले, तर नोकरीत बढती मिळण्याची शक्‍यता आहे. आपण शिकलो तर बढती मिळेल. मुलांच्या शिक्षणासाठी पैसे मिळतील. स्वप्नही पूर्ण होईल, या हेतूने अभ्यास केला. सर्वांनीच मला प्रोत्साहन दिले. त्यामुळे उत्तीर्ण झाले. आता टायपिंगही शिकत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: konkan news guhagar news ssc result