तिलारी अघोषित अभयारण्य

तिलारी अघोषित अभयारण्य

तिलारी धरणाच्या कोअर व बफर झोन क्षेत्रात हत्ती, वाघ, बिबट्या, ब्लॅक पॅंथरसारखे अनेक वन्यप्राणी बऱ्यापैकी स्थिरावल्याने तिलारी अघोषित अभयारण्यच बनले आहे. पर्यावरणप्रेमी, वन विभाग आणि हत्तींच्या उपद्रवामुळे त्रस्त झालेल्या अनेक शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास असलेला भाग घोषित अथवा अघोषित अभयारण्य व्हावे, असे वाटते आहे. कोल्हापूर येथील वनसंरक्षक अरविंद पाटील यांचे त्याच भागात हत्तींना पोसायचे आहे, हे वक्तव्य तिलारीतील वन्यप्राण्यांच्या अभयारण्याला वन विभागाचा पाठिंबा असल्याचे दर्शक, द्योतक आहे.
 

काय आहे तिलारीत?
तिलारी धरण प्रकल्पामुळे पाल, पाटये, आयनोडे, सरगवे, शिरंगे, केंद्रे खुर्द व बुद्रुक आदी गावांचे स्थलांतर झाले. त्यामुळे तेथील हजारो एकर जमीन बुडीत क्षेत्रात गेली तर हजारो एकर जमीन बुडीत क्षेत्राबाहेर राहिली. शिवाय वनसंज्ञा असलेली आणि वन विभागाच्या मालकीची शेकडो हेक्‍टर जमीनही त्याच भागात आहे. साहजिकच तो निर्मनुष्य भाग वन्यप्राण्यांसाठी सुरक्षित बनला. त्यामुळेच वनसंपदेने समृद्ध असलेल्या त्या भागात हत्ती, वाघ, बिबटे, अस्वल, ब्लॅक पॅंथर, किंग कोब्रा, सांबर, डुक्‍कर, गवे अशा अनेक वन्यप्राण्यांचा तेथे वावर असल्याचे सिद्ध झाले आहे. तेथे त्यांचा नुसता वावरच नाही तर त्यांची संख्याही वाढते आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने ती समाधानाची बाब आहे.

वाढती संख्या दिलासादायक
हत्ती, वाघ, ब्लॅक पॅंथरसारखे प्राणी जतन करणे, त्यांची पैदास वाढविणे, शिकार रोखणे ही वन विभागाची जबाबदारी आहे. त्यांनी नुकसान केले तर भरपाई देण्याचीही तरतूद आहे. जगभरात वाघ आणि हत्तींची संख्या दिवसेंदिवस घटत असल्याने पर्यावरणप्रेमी चिंता व्यक्त करत आहेत. त्याचवेळी कर्नाटकातून महाराष्ट्रातील सिंधुदुर्गामध्ये आलेले हत्ती तिलारीत स्थिरावले आहेत. त्यांच्या जोडीला वाघ, ब्लॅक पॅंथरही आहेत. विशेष म्हणजे तिलारीत म्हणजेच सह्याद्रीच्या डोंगरकड्यांत (पश्‍चिम घाटात) वावरणाऱ्या वाघांच्या संख्येत वाढ झाल्याचे पुरावेही समोर आले आहेत. वाघांबरोबरच वाघीण आणि बछडेही वन विभागाच्या छुप्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. आंबोलीपासून विर्डीपर्यंतचा भाग वाघांचा नैसर्गिक अधिवास बनला आहे.

घोषित आणि अघोषित अभयारण्य
वन्यप्राण्यांचा वावर असलेले क्षेत्र, मग ते शासनाने घोषित केलेले असो अथवा अघोषित असो, वन विभागाला त्या क्षेत्रातील वन्यप्राण्यांचे जतन व संगोपन करावेच लागते. त्यांचा वावर असलेले क्षेत्र घोषित झाले तर त्या क्षेत्रात कुठल्याही व्यक्तीला पूर्व परवानगीशिवाय जाता येत नाही. जेव्हा ते क्षेत्र घोषित होते तेव्हा त्यामधील प्राण्यांच्या संगोपनासाठी शासनाकडून स्वतंत्र निधी मिळतो. शिकारीबाबत म्हणाल तर इतके वनक्षेत्र अभयारण्य घोषित असतो की अघोषित, प्राण्यांची शिकार करता येत नाही आणि कुणी केली तर वन्यजीव कायद्यांतर्गत कारवाई होते.

...म्हणून ते स्थिरावलेत
वन्यप्राण्यांना ज्या भागात अभय, सुरक्षितता असते तो अरण्याचा भाग म्हणजे अभयारण्य. जेथे त्यांचा मुक्काम असतो त्याला कोअर झोन म्हणतात, तर त्याबाहेरचा त्यांचा वावराचा भाग तो बफर झोन असतो. अभयारण्यातील अंतर्गत भागात म्हणजे कोअर झोनमध्ये त्यांच्या खाण्या-पिण्याची उत्तम व्यवस्था असावी लागते. सद्य:स्थितीत तिलारी धरणाचे बुडीत क्षेत्र व आजूबाजूचा निर्मनुष्य भाग कोअर झोनच म्हणावा लागेल. वन्यप्राण्यांना आवश्‍यक असलेले खाद्य आणि पाणी तेथे मुबलक प्रमाणात मिळते आहे. शिवाय तो भाग ‘नो डिस्टर्बन्स झोन’ असल्याने हत्तीसह अन्य वन्यप्राणी स्थिरावत आहेत.

हेवाळे हत्तींच्या रडारवर
तिलारी धरणाच्या बुडीत क्षेत्रात नाहीतर बांबर्डे घाटीवडेमधील वन विभागाच्या जंगलात राहणारे हत्ती अधूनमधून आयनोडे, हेवाळे गावच्या हद्दीतील बाबरवाडी, घाटीवडे, बांबर्डे, राणेवाडी या वाड्यांवरच्या वस्तीलगत आणि शेती बागायतीत घुसून नुकसान करतात. मागील महिन्यात काही दिवस ते सोनावलमध्ये गेले होते. पण तेथे स्थिरावले नाहीत. सह्याद्रीच्या म्हणजेच पश्‍चिम घाटाच्या पायथ्याशी असलेल्या हेवाळे गावात त्यांचा वावर होता. भातशेती, माड, पोफळी, केळी यांचे त्यांनी नुकसान केले. त्यांना मानवी वस्तीपासून दूर ठेवणे हाच पर्याय ठरू शकेल.

कणक लागवडीची तयारी
तिलारीच्या बुडीत क्षेत्रात हत्ती स्थिरावले ते कणकीच्या कोंबामुळे. फणस, कणकीचे कोंब, भेडले माड, भातशेती, नारळ, केळी हे हत्तींचे आवडते खाद्य. गेल्या काही वर्षांत तिलारी खोऱ्यातील बहुतांश कणकीची बेटे फुलली आणि मेली. त्यामुळे हत्तींना खाद्य कमी पडू लागले. ते लक्षात घेऊन वन विभागाने कणकीची हजारो रोपे रोपवाटिकेमधून तयार केली आहेत. कोनाळ, हेवाळे, बांबर्डे परिसरात जवळपास आठ हजार रोपे लावण्याची तयारी पूर्ण झाली आहे. मानवी वस्तीकडे कूच करणाऱ्या हत्तींना सीमेवरच रोखण्याची तयारी त्यातून वन विभागाने केली आहे. शिवाय वन विभागाच्या जवळपास तीन-चारशे हेक्‍टर क्षेत्रात कणकीची बेटे उगवण्याची तयारी सुरू आहे. 

जिल्हाधिकारी ‘हत्ती पकड’साठी आग्रही
सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी हत्ती पकड मोहिमेसाठी आग्रही आहेत. त्यासाठी वरिष्ठांशी पत्रव्यवहार करणार असल्याचे ते म्हणतात. त्यांनी नुकतीच हेवाळे गावाला भेटही दिली; मात्र त्यांच्या त्या भूमिकेबाबत पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली. माणगाव खोऱ्यात हत्तींचे बळी गेले; तसे बळी गेले तर त्याची जबाबदारी जिल्हाधिकारी स्वीकारतील का, असा त्यांचा सवाल आहे.

किती हत्ती आहेत?
पूर्वीचे चार व नंतरचे सात असे अकरा हत्ती तिलारीत होते. सोनावलकडे गेलेले चार हत्ती मध्यंतरी गायब झाले. तर सात हत्तींचा वावर होता. त्यातील दोन हत्ती सध्या बांबर्डे परिसरात असल्याचे आज स्पष्ट झाले. त्यामुळे बाकीचे हत्ती कर्नाटककडे परतले की बुडीत क्षेत्रात आहेत, याबाबत खात्रीशीर माहिती उपलब्ध झाली नाही.

हत्ती पकडणे कठीणच!
शेती बागायतीचे नुकसान करणाऱ्या हत्तींना पकडून प्रशिक्षित करणे किंवा कर्नाटकातील जंगलात सोडणे तितकेसे सोपे नाही. माणगाव खोऱ्यातील (ता. कुडाळ) हत्तींना पकडले तेव्हा काही हत्तीचे प्राण गेले. शिवाय तेथील भौगोलिक परिस्थिती आणि तिलारी खोऱ्यातील भौगोलिक परिस्थितीत फरक आहे. येथील जंगल घनदाट आहे. जंगलाच्या जवळ तिलारीचा भलामोठा जलाशय आहे आणि डोंगराचे तीव्र चढउतार आहेत त्यामुळे तिलारीत हत्ती पकड मोहीम राबवणे अशक्‍य असल्याचे मत सर्वच वनाधिकाऱ्यांचे आहे. त्यामुळेच हत्तींना जोपर्यंत ते येथे राहतील तोपर्यंत वस्तीपासून दूर ठेवण्यासाठी सर्व प्रयत्न करायचे, असा निर्णय त्यांनी घेतल्याचे दिसते. 

शेतकऱ्यांना हवे स्वेच्छा पुनर्वसन
अधूनमधून तरीही सातत्याने हत्तींकडून शेती बागायतीचे नुकसान होत असल्याने अनेक शेतकरी स्वेच्छा पुनर्वसनाची मागणी करीत आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पग्रस्तांना ज्या पद्धतीने स्वेच्छा पुनर्वसन दिले गेले त्याप्रमाणे आपणालाही मिळावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

वस्तीपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न
मानवी वस्तीत घुसून हत्तींकडून शेती बागायतीचे नुकसान केले जाते. ते रोखून हत्तींना मानवी वस्तीपासून दूर त्यांच्या नैसर्गिक अधिवासातच ठेवण्याचे प्रयत्न वन विभागाने सुरू केले आहेत. त्यासाठी मक्‍याची लागवड, ऊस शेती प्रकल्प, कणकीच्या बेटाची लागवड अशा उपाययोजना करण्यात येत आहेत. तिलारी बुडीत क्षेत्राबाहेरील वन विभागाच्या जागेत मोठ्या प्रमाणात ऊस शेती करण्याचे निश्‍चित झाले आहे. तसेच हत्तीच्या येण्या-जाण्याच्या वाटेवर खिळे असलेले सिमेंटचे कुंपण उभारण्यात येणार आहे. 

काय आहे स्वेच्छा पुनर्वसन?
मेळघाटसारख्या व्याघ्र प्रकल्पाच्या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन केले जाते. कोअर व बफर झोनमधील शेतकऱ्यांना पुनर्वसनाची तरतूद आहे. पुनर्वसनाचेही दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात शासन प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या जमिनीच्या बदल्यात जमीन देतात, घरे, शाळा व अन्य प्रशासकीय इमारती बाधून देते, तर दुसऱ्या प्रकारात कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला केवळ दहा लाख रुपये दिले जातात. स्वेच्छा पुनर्वसन करणाऱ्यांचा शासकीय अर्ज भरून घेतला जातो. त्यानंतर पुनर्वसनाबाबत निर्णय होतो. हत्तीबाधित शेतकऱ्यांसाठी त्या पद्धतीची योजना लागू व्हावी यासाठी शासनस्तरावरून आणि संघटित प्रयत्नांची गरज आहे.

अभयारण्याच्या दिशेने वाटचाल
हत्तींना रोखण्याचे आत्तापर्यंत सगळे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. हत्तीच्या मार्गावरील मिरचीपूड व ऑईलमिश्रित दोरखंड, खंदक, सिमेंटची भिंत, लोखंडी खांब, फटाके, ॲटमबाँब या सर्व उपाययोजना निष्प्रभ ठरल्या. एवढेच नाही तर गाजावाजा करून राबवलेली ‘एलिफंट बॅक टू होम’ नावाची हत्ती पकड मोहीमही सपशेल फसली. अशा स्थितीत पुन्हा हत्ती पकड मोहीम राबवून जोखीम स्वीकारण्यापेक्षा त्यांना त्यांच्या तिलारीतील नैसर्गिक अधिवासात पोसण्याची मानसिकता वन विभागाने बनवली आहे. हत्ती परतले किंवा त्यांना पिटाळले तरी ते पुन्हा येणारच याची खात्री झाल्यामुळेच वन विभाग अघोषित अभयारण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे स्पष्ट होत आहे. सर्वच वन्यप्राण्यांचा मुक्काम तिलारीत असल्याने ते अघोषित अभयारण्यच तर आहे त्याला आणखी काय म्हणणार?

वाघांची प्रगणना
मे महिन्यात वाघांची प्रगणना करण्यात आली. पहिल्याच दिवशी वाघांचे अस्तित्व पाऊलखुणांवरून स्पष्ट झाले. दरवर्षी वन विभागाकडून उन्हाळ्यात पाणवठ्याजवळ छुपे कॅमेरे लावले जातात. त्यातही वाघ, बछड्यांसह वाघीण, अस्वल, ब्लॅक पॅंथर यांची छबी कैद झाली आहे. त्यामुळे हत्तींबरोबरच त्यांचाही मुक्काम तिलारीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com