फक्त माणूस बनून जगू या - दिशा शेख

अमित गवळे
बुधवार, 14 मार्च 2018

दिशा शेख यांच्या मांडणीने सर्व उपस्थितांना एक माणूस म्हणून विचार करायला प्रवृत्त केले. रिक्षा चालक शालिनीताई गुरव  यांनी मनोगतात मांडलेला संघर्षमय प्रवास ऐकताना पुरूषी व्यवस्थेतील स्त्री च्या संघर्षाची जाणीव उपस्थितांना झाली

पाली - 'आपल्या जेंडर कल्पनांनी माणसाचे गट केले आहेत. पितृसत्ताक व्यवस्थेने स्त्री आणि एलजीबीटी या गटांवर बंधने लादली. त्यांच्या जगण्याचे मार्ग संकुचित केले. हे बदलायचं असेल तर आपण फक्त माणूस बनून जगू या' असे प्रतिपादन तृतीय पंथी कार्यकर्ती व कवयित्री दिशा शेख यांनी केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पनवेल शाखेने जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. ऍम्पी थिएटर, सिडको गार्डन, सेक्टर 11, नवीन पनवेल येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.  

महा. अंनिस पनवेल शाखेतर्फे दरवर्षी या दोन्ही दिवसांचे औचित्य साधून डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती व कार्यगौरव पुरस्कार प्रदान केले जातात. या वर्षी चाकोरीच्या बाहेर जावून रिक्षा चालक म्हणून यशस्वी कार्यरत असलेल्या महिला रिक्षा चालकांना डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरुषी व्यवस्थेतील व्यवसायाची मक्तेदारी मोडून काढत, ज्या रिक्षांतून रात्री- अपरात्री प्रवास करायला भिती वाटायची त्याच रिक्षाचं चालकत्व स्विकारणाऱ्या पनवेलमधील शालिनी गुरव, सुनीता जाधव, ललिता राऊत, वर्षा राजगुडे, आशा तागडे, कल्पना सारडे, आशा घालमे, मनीषा देशमुख  या आठ महिला रिक्षा चालकांना सन्मानित करण्यात आले.  

या महिलांनी कुटुंबापासून प्रस्थापित रिक्षा चालकांपर्यंत प्रत्येक ठिकाणी संघर्ष करत या व्यवसायात घट्ट पाय रोवले आहेत.  तसेच यावेळी तृतीय पंथी चाकोरीतल जगणं नाकारून व्यवस्थेविरूद्ध बंड पुकारणाऱ्या व आपल्या भावना विद्रोही कवितांतून व्यक्त करणाऱ्या दिशा शेख हिस डॉ. नरेंद्र दाभोलकर कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

दिशा शेख यांच्या मांडणीने सर्व उपस्थितांना एक माणूस म्हणून विचार करायला प्रवृत्त केले. रिक्षा चालक शालिनीताई गुरव  यांनी मनोगतात मांडलेला संघर्षमय प्रवास ऐकताना पुरूषी व्यवस्थेतील स्त्री च्या संघर्षाची जाणीव उपस्थितांना झाली.

या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्र संचलन तेजल खेडेकर हिने केले, तर स्वागत व आभार प्रियांका खेडेकर हिने व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महेंद्र व आरती नाईक, मनोहर तांडेल, नाजुका, हर्षल, मानसी, धनाजी या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: konkan news women award