
रत्नागिरी : कोरोनाच्या टाळेबंदीमुळे कोकणात परतलेले व गणेशोत्सवासाठी आलेले चाकरमानी मुंबईकडे परतण्यासाठी कोकण रेल्वेच्या गणेशोत्सव स्पेशल गाड्यांचा उपयोग करत आहे. गौरी-गणपती विसर्जनानंतर दुसऱ्याच दिवशीपासून रेल्वे गाड्यांनी प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. दिवसाला चार गाड्या कोकणातून मुंबईकडे रवाना होत असून त्याचे आरक्षित तिकिटांसाठी चाकरमान्यांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे कोरे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर 22 मार्चपासून टाळेबंदी केली. गर्दी टाळण्यासाठी एसटी, रेल्वे वाहतूक बंद केली. मुंबईत कोरोनाचा उद्रेक सुरू झाल्यानंतर अनेक चाकरमानी गावाकडे परतु लागले. सुमारे पावणेदोन लाख चाकरमानी रत्नागिरी जिल्ह्यात आले. उर्वरित काहींनी गणेशोत्सवाचा मुहूर्त पकडून गावाकडे येणे पसंत केले. त्यांच्यासाठी 15 ऑगस्टला कोकण रेल्वे मार्गावर जादा गाड्या सोडल्या. क्वारंटाईन कालावधीमुळे मुंबईतून येणाऱ्या चाकरमान्यांना त्याचा फायदा झाला नाही. अनेकांनी एसटीपेक्षाही खासगी वाहनांमधून गावाकडे येणे पसंत केले.
मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात सुमारे 51 हजार चाकरमानी दाखल झाले. काहींनी मुंबईतच राहणे पसंत केले होते. तो आकडा सुमारे तीस ते चाळीस हजारापर्यंत असण्याची शक्यता आहे. गुरुवारी गौरी-गणपती विसर्जन झाले. त्यानंतर चाकरमानी मुंबईकडे परतू लागले आहेत. एसटीबरोबरच रत्नागिरी, सिंधुदुर्गातील लोकांचा रेल्वेकडेही कल आहे. प्रत्येक डब्यामध्ये किमान वीस ते पंचवीस प्रवासी प्रवास करताना दिसत होते. विसर्जनाच्या दुसऱ्या दिवसापासून परतीचा प्रवास सुरु झाला आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांची आरक्षित तिकिटांसाठी प्रवाशांचा प्रतिसाद अधिक आहे. रत्नागिरी रेल्वेस्थानकातून दोनशे ते अडीचशे प्रवासी दिवसभरातील प्रत्येक गाडीतून रवाना होत होते. गणेशोत्सवालाच नव्हे तर कोरोनामुळे कोकणात आलेले काही चाकरमानीही या निमित्ताने मुंबईत परतू लागले आहे. प्रत्येक रेल्वे स्थानकावर स्क्रिनिंग सुरू आहे. त्यासाठी आरोग्य विभागाचे पथक नियुक्त आहे.
दंडात्मक कारवाई
तिकिटाचे आरक्षण नसलेल्या प्रवाशांवर प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. दोन दिवसांत सुमारे तीस ते चाळीस प्रवाशांवर दंडात्मक कारवाई झालेली आहे.
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.