#KonkanRain सरासरी पावसात आंबोली मागे

अनिल चव्हाण
शनिवार, 27 जुलै 2019

आंबोली - येथे आतापर्यंत १२० इंच इतका पाऊस झाला आहे. अलीकडच्या काळात आतापर्यंत सर्वांत कमी पावसाची नोंद यंदा येथे झाली आहे. मात्र, पावसाचा जोर पाहता सरासरी यावर्षी २५० इंचाच्या पुढे पाऊस होण्याची चिन्हे आहेत. 

आंबोली - येथे आतापर्यंत १२० इंच इतका पाऊस झाला आहे. अलीकडच्या काळात आतापर्यंत सर्वांत कमी पावसाची नोंद यंदा येथे झाली आहे. मात्र, पावसाचा जोर पाहता सरासरी यावर्षी २५० इंचाच्या पुढे पाऊस होण्याची चिन्हे आहेत. 

राज्यातील सर्वाधिक आणि देशातील टॉप फाईव्ह मधले जास्त पाऊस होणारे समुद्रसपाटीपासून उंच ठिकाण म्हणून आंबोलीकडे पाहिले जाते. येथील पावसात वर्षा पर्यटनाची क्रेझ असते. याचे कारण इथला मुसळधार पाऊस आणि पावसाळ्यात उंच कड्यावरून कोसळणारे धबधबे, त्याचबरोबर धुक्‍यात हरवलेला आणि निसर्गरम्य दऱ्याडोंगरांचा परिसर आणि त्याचबरोबर हवेतला गारवा. या वातावरणासाठी मुसळधार पाऊस अपेक्षित असतो. राज्यात सर्वाधिक पाऊस येथे पडतो. साधारण आंबोलीत ३० इंच पाऊस झाला की नदी, नाले आणि धरण भरून ओसंडून वाहू लागतात. विहिरी भरतात. पाण्याची पातळी वर येते. बाकीचे पाणी हे वाहून जात असते. हिरण्यकेशी नदीचे पाणी गडहिंग्लज तसेच पुढे कर्नाटकला जाते.

जिल्ह्यातील ही एकमेव पश्‍चिम महाराष्ट्रात जाणारी पूर्व वाहिनी नदी आहे. बाकीचे पाणी घाटातून दाणोलीमार्गे समुद्राला जाऊन मिळते. त्यामुळे येथे पडणाऱ्या एकूण पावसावर येथून उगम पावणाऱ्या नद्याही अवलंबून असतात. त्यामुळे आंबोलीत किती पाऊस पडतो याची उत्सुकता असते.

यंदा पाऊस उशिरा सुरू झाला. यामुळे आतापर्यंतची सरासरी कमी आहे. मात्र, सध्या पावसाचे प्रमाण पाहता तो सरासरी गाठेल, असे वाटते.
- भाऊ ओगले,
पर्जन्यमापक, आंबोली.

यावर्षी मॉन्सून १४ जूनपासून सुरू झाला. पावसाळा उशिरा सुरू झाल्याने आतापर्यंतचे पावसाचे प्रमाण तुलनेत कमी आहे. जुलैच्या आजच्या तारखेपर्यंत सरासरी पावणे दोनशेच्या आसपास पाऊस झालेला असतो. जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात २०० इंचाच्यावर पाऊस झालेला असतो. यंदा मात्र हे प्रमाण १२० इंच इतकेच आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Konkan Rain Amboli behind in average rainfall