#Konkan Rain राजापूर शहराला पाण्याचा वेढा

राजेंद्र बाईत
गुरुवार, 11 जुलै 2019

राजापूर - पावसाची संततधार कोकणात सुरु आहे. त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे.  शहरातील जवाहर चौकातील टपऱ्यांसह नदी काठचा बहुतांश भाग पाण्याखाली गेला आहे.

राजापूर - पावसाची संततधार कोकणात सुरु आहे. त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे.  शहरातील जवाहर चौकातील टपऱ्यांसह नदी काठचा बहुतांश भाग पाण्याखाली गेला आहे. पावसाचा जोर कायम असल्याने पुराचे पाणी शहरात घुसण्याच्या भीतीने सतर्क झालेल्या व्यापाऱ्यांनी दुकानातील माल सुरक्षित ठिकाणी हलविण्याला सुरूवात केली. पालिकेने दुपारी एक वाजता भोंगा वाजवून लोकांना सतर्कतेचा इशारा दिला.

पुराच्या वाढणाऱ्या पाण्याने बंदरधक्का येथे भरलेल्या आठवडा बाजार व्यापाऱ्यांना दुपारीच गुंडाळावा लागला. काल दिवसभर सातत्याने पडणाऱ्या पावसाने आज सकाळपासूनच जोर धरला होता. त्यामुळे शहरामध्ये यावर्षी पहिल्यांदाच पूर येण्याची शक्‍यता लोकांमधून व्यक्त केली जात होती. अशा स्थितितही अर्जुना-कोदवली नद्यांच्या संगमाच्या बंदरधक्का येथील परिसरामध्ये आठवडा बाजार भरला होता.

आठवडा बाजारामध्येही लोकांची खरेदी-विक्रीसाठी गर्दी होती. सततधार पडणाऱ्या पावसाचा जोर वाढत असताना अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली. शहरात दुपारी पूरस्थिती निर्माण झाली. यामध्ये शहरातील बंदरधक्का परिसर, वरचीपेठ, मुन्शी नाका रस्ता, जवाहरचौकातील अर्जुना नदीच्या काठावरील टपऱ्या यांसह शीळ- चिखलगाव-गोठणेदोनिवडे गावाकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला.

अचानक वाढलेल्या या पाण्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले. बंदरधक्का येथील आठवडा बाजारामध्ये अचानक पाणी घुसल्याने सामानाची आवराआवर करताना व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. त्यामध्ये दुपारीच आठवडा बाजार गुंडाळण्यात आला. पाणी बाजारपेठेमध्ये घुसण्याच्या शक्‍यतेमुळे व्यापारीवर्ग चांगलाच सतर्क झाला. काही व्यापाऱ्यांनी मालाची सुरक्षित ठिकाणी हलवाहलव करण्यालाही सुरूवात केली होती.

एस.टी.गाड्याही चौकात येण्याचे थांबविले

नगर पालिकेच्या मुख्याधिकारी नयना ससाणे, मुख्य लिपिक किशोर जाधव यांनी संभाव्य पूरस्थितीची पाहणी केली. यावेळी पालिकेचे कर्मचारी जितेंद्र जाधव, कांबळे आदी उपस्थित होते. पाणी वाढू लागल्याने जवाहर चौकात येणाऱ्या एस.टी.गाड्याही चौकात येण्याचे थांबविण्यात आले होते. त्यामुळे ग्रामीण भागात जाणाऱ्या लोकांचे चांगलेच हाल झाले होते. 

दृष्टिक्षेप 

  • काठावरील बहुतांश भाग पाण्याखाली 
  • आठवडा बाजार दुपारीच गुंडाळला
  • चिखलगाव-गोठणेदोनिवडे रस्ता पाण्याखाली
  • ग्रामीण भागात जनतेचे वाहतुकीचे हाल

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Konkan Rain flood situation in Rajapur city