esakal | #KonkanRains खारेपाटणला पुराचा पुन्हा वेढा; डोंगर खचले
sakal

बोलून बातमी शोधा

#KonkanRains खारेपाटणला पुराचा पुन्हा वेढा; डोंगर खचले
  • कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत. सर्वच गाड्या 3 ते 8 तास विलंबाने 
  • तुळस पलतड भागातील डोंगर खचला 
  • काळसे बागवाडी येथील घरांना अजूनही पुराचा वेढा 
  • पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरू झाल्याने वाहन चालकांना दिलासा 

#KonkanRains खारेपाटणला पुराचा पुन्हा वेढा; डोंगर खचले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कणकवली - पावसाने काहीशी उसंत घेतल्याने सिंधुदुर्गातील पूरस्थिती ओसरली आहे; मात्र खारेपाटणमध्ये पुन्हा पूरसंकट उभे राहिले आहे. तेथे आज सायंकाळी पुन्हा पाणी भरायला सुरवात झाली. सलग सहा दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगर खचण्याचा धोका कायम राहिला आहे. काल शिरशिंगे, झोळंबे, सरंबळ, असनिये, तुळस या भागातील डोंगर खचून लोकवस्तीला धोका निर्माण झाला होता. यात आज तुळस पलतड येथील डोंगर पुन्हा खचल्याने 32 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. काळसे बागवाडी येथील घरे अजूनही पुराच्या वेढ्यात आहेत. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात लाखोंची हानी झाली असून महसूलकडून नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे. 

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी झाडे कोसळून रस्ता ठप्प होण्याच्या घटना घडत आहेत. घरे, गोठ्यांचीही पडझड सुरू आहे. गावोगावी वीज तारा आणि खांब कोसळल्याने अनेक गावातील वीजपुरवठा ठप्प आहे. पूरस्थितीमुळे मिरजेहून येणारा पेट्रोल-डिझेल पुरवठा अजूनही सुरळीत झालेला नाही. त्यामुळे एस.टी.च्या तब्बल 1130 फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. जिल्ह्यात सध्या चंदगड भागातून दूध आणि भाजीपुरवठा होत असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मुंबईहून निघालेले पेट्रोल-डिझेलचे टॅंकर दुपारनंतर जिल्ह्यात दाखल झाल्याने पेट्रोल-डिझेल टंचाईतून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. 

जिल्ह्यात मागील सहा दिवसाच्या अतिवृष्टीत 493 कुटुंबातील दोन हजारहून अधिक कुटुंबांना स्थलांतरीत करण्यात आले होते. तिलारी धरणातील पाण्याचा विसर्ग असल्याने दोडामार्ग तालुक्‍यातील अनेक गावे अजूनही धोक्‍याच्या छायेत आहेत. पूरस्थितीमुळे शिरंगे येथील पुनर्वसन वसाहतीत कोनाळकट्टा ठाकरवाडी आणि घोटगे वायंगणतडवाडी येथील कुटुंबे स्थलांतरित झाली आहेत. शिरशिंगे गोठवेवाडी आणि असनिये कणेवाडीतील डोंगर खचल्याने 150 हून अधिक कुटुंबे धोक्‍यात आली आहेत. 

खारेपाटण बाजारपेठेत आज सायंकाळी सातनंतर पुन्हा महापुराचे पाणी भरू लागल्याने व्यापारी वर्गाची धावपळ उडाली आहे. खारेपाटण शहराबरोबरच विजयदुर्ग खाडीलगतच्या मणचे, मुटाट, कोर्ले, धालवली, पोंभुर्ले या गावांमध्येही पुराच्या पाण्याचा शिरकाव झाल्याने गावात पुन्हा भीतीचे वातावरण आहे. 

गेले दोन दिवस पावसाने काहीशी उसंत घेतल्याने खारेपाटणमधील पूरस्थिती ओसरली होती. व्यापाऱ्यांनीही आपले साहित्य पुन्हा बाजारपेठेत आणले होते; मात्र सायंकाळी सातनंतर बाजारपेठेत पुन्हा पुराचे पाणी येऊ लागल्याने साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी व्यापारी वर्गाने धावपळ सुरू केली आहे. खारेपाटण परिसरात आज दिवसभरात मुसळधार सरी सुरू होत्या. मात्र पुराची शक्‍यता वाटत नव्हती. अचानक पाणी येऊ लागल्याने व्यापाऱ्यांसह नागरिकांची धावपळ उडाली आहे. 

कुडाळ तालुक्‍यातील पूरस्थिती ओसरली आहे; मात्र पडझडीच्या घटना सुरू आहेत. सरंबळ देऊळवाडी डोंगर खचल्याने तेथून 15 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. मालवण तालुक्‍यातही पूरस्थिती नियंत्रणात आली आहे. मात्र काळसे बागवाडी येथील घरांना अजूनही पुराच्या पाण्याचा वेढा आहे. या वाडीतील वीजपुरवठा देखील गेले चार दिवस ठप्प आहे. 

कणकवली तालुक्‍यातील पूरस्थिती पूर्णतः ओसरली आहे. विजयदुर्ग खाडीपात्रात पूरस्थिती कायम असल्याने खारेपाटण शहराला अजूनही पुराचा धोका कायम आहे. कणकवली तालुक्‍यातील सर्व मार्ग मोकळे झाले आहेत. मात्र जुनाट वटवृक्ष कोसळण्याचा धोका कायम आहे. आज दुपारी अडीचच्या सुमारास आचरा मार्गावरील वटवृक्ष कोसळल्याने येथील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. 

अतिवृष्टीमुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक अजूनही विस्कळीत असून सर्वच गाड्या दोन ते आठ तास विलंबाने धावत आहेत. मंगला, मंगलोर एक्‍स्प्रेस, राजधानी, नेत्रावती, मत्स्यगंधा या गाड्या 4 ते 8 तास विलंबाने धावत आहेत. कोकणकन्या, मांडवी आणि तुतारी एक्‍स्प्रेस या सिंधुदुर्गवासीयांच्या गाड्या दोन ते तीन तास विलंबाने धावत आहेत. 

वेंगुर्ले तालुक्‍यातील तुळस पलतड परबवाडी येथील डोंगर कोसळून पायथ्याशी असणाऱ्या सुमारे 32 कुटुंबातील 124 राहिवाशांना पलतड नाईकवाडी येथील सरस्वती विद्यामंदिर या प्राथमिक शाळेत स्थलांतरीत करण्यात आले आहेत; मात्र नागरिकांना स्थलांतरीत होऊन दोन दिवस झाले तरी प्रशासनाकडून कोणतीही तत्काळ मदत न झाल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सतत डोंगराचा काही भाग कोसळत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 

तालुक्‍यात बुधवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासहीत पावसामुळे तुळस येथील डोंगर खचून रस्ता उचलून तुटला होता. यामुळे या डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या घरांना धोका निर्माण झाला आहे. याची पाहणी करून तहसीलदारांनी नागरिकांना स्थलांतराच्या नोटिसा दिल्या होत्या. दरम्यान, सायंकाळपासून पुन्हा काही प्रमाणात डोंगर खचायला लागल्यामुळे स्थलांतरित करण्यात आले.

यावेळी काल (ता.8) सरस्वती विद्यालय येथे प्रशासनातर्फे मंडळ अधिकारी जाधव, तलाठी श्रीमती वजराठकर उपस्थित होते. आरोग्य यंत्रणेतर्फे आरोग्य सहायक नर्लेकर, आरोग्य सेवक तळकर, शिरसाट, आरोग्य सेविका श्रीमती शिरसाट, श्रीमती राऊळ यांनी नागरिकांची तपासणी केली व अन्य सुविधांसाठी मदत केली. यावेळी शिवसेना विभागप्रमुख संजय परब, ग्रामपंचायत सदस्य सुशील परब, चंद्रे परब, समीर शेटकर, राजन आरोस्कर, भूषण आरोस्कर, तंटामुक्ती अध्यक्ष नाना राऊळ, वेताळ प्रतिष्ठाने अध्यक्ष सचिन परुळकर, राष्ट्रवादीचे संदीप पेडणेकर आदींनी नागरिकांना धीर देत मदत केली आहे. 

दरम्यान, गुरुवारी तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी घटनास्थळी पाहणी करून स्थलांतरणाच्या नोटिसा दिल्या खऱ्या मात्र याठिकाणी नागरिकांना जेवणाची तसेच इतर तत्काळ कोणतीही मदत आज सायंकाळपर्यंत न केल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 

रात्र जागून काढावी लागणार 
खारेपाटण परिसरात सायंकाळनंतर ढगफुटीसदृश पाऊस होत आहे. हा पाऊस थांबला नाही तर खारेपाटण शहरात मोठ्या प्रमाणात पाणी येण्याची शक्‍यता नागरिकांतून व्यक्‍त झाली. त्यामुळे आजची रात्र नागरिकांना जागून काढावी लागणार आहे.

loading image