#KonkanRains चिपळूणला पुराचा विळखा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

चिपळूण - चिपळूणवर सलग तिसऱ्या दिवशीही जलसंकट घोंगावत आहे. सलग पाणी भरल्याने शहराचे जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले असून, जनता भीतीच्या छायेखालीच आहे. २००५ नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात अस्मानी संकट शहराने प्रथमच अनुभवले. संपर्काचे सर्व मार्ग बंद, पाण्याची पातळी सतत वाढती, वाहतूक कोंडी, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न, विजेचा खेळखंडोबा या साऱ्याशी चिपळूणकर मोठ्या हिमतीने लढत आहेत.

चिपळूण - चिपळूणवर सलग तिसऱ्या दिवशीही जलसंकट घोंगावत आहे. सलग पाणी भरल्याने शहराचे जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले असून, जनता भीतीच्या छायेखालीच आहे. २००५ नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात अस्मानी संकट शहराने प्रथमच अनुभवले. संपर्काचे सर्व मार्ग बंद, पाण्याची पातळी सतत वाढती, वाहतूक कोंडी, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न, विजेचा खेळखंडोबा या साऱ्याशी चिपळूणकर मोठ्या हिमतीने लढत आहेत.

 पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र काम करून चिपळूणवासीयांना थोडा दिलासा दिला. पालिका इमारतीपासून एसटी स्थानक, भोगाळे, पेठमाप, फरशी तिठा, बाजारपेठ, खेर्डी येथे पाण्याने सर्वाधिक उंची गाठली आहे.

चिपळूणला सलग तिसऱ्या दिवशी पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. चिपळूण बाजारपेठेसह खेर्डी परिसरात पूर भरला असून येथील जनजीवन विस्कळित झाले आहे. वाशिष्ठी नदीने धोक्‍याची पातळी ओलांडल्याने बहादूरशेख पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. चिपळुणातील नागरिकांना तब्बल सात वेळा पुराचा सामना करावा लागला आहे.

जून महिन्यात पाऊस उशिरा सुरू झाला; मात्र नंतर पावसाने जो वेग घेतला आहे, तो आतापर्यंत कायम आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी आतापर्यंत विक्रमी पाऊस पडला आहे. वाशिष्ठी, शिवनदी धोक्‍याची पातळी ओलांडत असल्याने चिपळूण बाजारपेठेत हळूहळू पाणी शिरण्यास सुरुवात होते. जुना बसस्थानक, चिंचनाका, अनंत आईस फॅक्‍टरी, वडनाका, वेस मारुती मंदिर, बहादूरशेख नाका, तर जुना बाजारपूल परिसर तसेच खेर्डी परिसरात पाणी साचते. ही परिस्थिती गेले काही दिवस सुरू आहे. चिपळुणात तब्बल आठ वेळा पाणी भरले आहे. तर आता सलग तीन दिवस चिपळूणला पुराचा वेढा बसला आहे. पुराचे पाणी चिपळूण व खेर्डी बाजारपेठेतील दुकानात शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. तसेच आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे. मंगळवारी तिसऱ्या दिवशी पुराचे पाणी कायम राहिल्याने चिपळूण तिसऱ्या दिवशी ठप्प झाले आहे.

पाण्यात नसलेल्यांचेही हाल 
चिपळूणमध्ये सातव्यांदा पाणी भरल्याने चिपळूणवासीय हैराण झाले असून जनजीवन विस्कळित झाले आहे. अनेक भागात पुराचे पाणी शिरल्याने नागरिक मेटाकुटीला आले आहेत. सर्व मार्ग बंद आहेत. अनेक भागात वीज नसल्याने पिण्याच्या पाण्यावाचून लोकांचे हाल होत आहेत. पाण्यात असलेले आणि नसलेल्यांचेही हाल होत आहेत. अनेक घरांमधून दोन ते सहा फूट पाणी आहे. अनेक कुटुंबांनी सुरक्षित आसरा घेतला आहे. तहसीलदार जीवन देसाई, पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते आदी अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. अनेक सामाजिक कार्यकर्ते आपापल्या परीने मदतकार्य करीत आहेत. पालिका कर्मचारी पहाटेपासूनच शहरात फिरून मदतकार्य करीत आहेत. चिपळूणमधील परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे.

अडरे रायवाडी येथे गुरांचा गोठा कोसळला
सोमवारी (ता. ५) रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे चिपळूण तालुक्‍यातील अडरे रायवाडी येथील देवजी धोंडू जाबरे यांचा गुरांचा गोठा सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कोसळला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही; मात्र या गोठ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोमवारपासून या भागात मुसळधार पाऊस पडत असून पाण्याचा प्रवाह वाढला. त्यामुळे प्रवाह बदलल्याने पाणी गोठ्यात शिरले आणि गोठा कोसळला. हा गोठा कौलारू आणि जांभ्या दगडांच्या खांबावर बांधण्यात आला होता. त्यामुळे या गोठ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या गोठ्यात गुरांना लागणारे खाद्य (पेंढा) पावसात भिजल्याने जनावरांसाठी वैरणीचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाऊस जास्त असल्याने पंचनामा करण्यात आलेला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Konkan Rains Flood situation in Chiplun