#KonkanRains शास्त्रीनदीला पुर; संगमेश्वर बाजारपेठेत पाणी  

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

देवरूख - गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाने संगमेश्‍वर तालुक्‍यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. रविवारी (ता. 28) संध्याकाळी शास्त्रीनदीचे पाणी संगमेश्‍वरच्या आठवडा बाजारात घुसले. आज दुपारपर्यंत ते कायम राहिल्याने पावसाचा जोर कायम राहिल्यास संगमेश्‍वरवर पुन्हा पुराची टांगती तलवार कायम आहे. 

देवरूख - गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाने संगमेश्‍वर तालुक्‍यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. रविवारी (ता. 28) संध्याकाळी शास्त्रीनदीचे पाणी संगमेश्‍वरच्या आठवडा बाजारात घुसले. आज दुपारपर्यंत ते कायम राहिल्याने पावसाचा जोर कायम राहिल्यास संगमेश्‍वरवर पुन्हा पुराची टांगती तलवार कायम आहे. 

गेले दोन दिवस तालुक्‍यात पावसाचा जोर अधिक आहे. साखरप्यातील काजळी, संगमेश्‍वरातील सोनवी, शास्त्री, असावी, सप्तलिंगी, बावनदी, गडनदी दुथड्या भरून वाहत आहेत. अनेक भागात नदीकिनारी पाणी घुसल्याने काठावरची भातशेती धोक्‍यात आली आहे. रविवारी संध्याकाळी संगमेश्‍वरातील रामपेठेत पावसाचे पाणी घुसले. त्यानंतर आठवडा बाजाराकडे पाण्याने मोर्चा वळवला. पाण्याचा जोर जास्त असल्याने हे पाणी गेले 12 तास कायम आहे. यामुळे आठवडा बाजारातून रामपेठेत ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे. सह्याद्रीच्या खोऱ्यात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने नद्यांचे पाणी कायम असून पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास संगमेश्‍वरला पुराचा धोका आहे. यावर्षी दोन वेळा आठवडा बाजारात पाणी घुसून नुकसान झाले आहे. 

सतर्कतेच्या सूचना 
बुधवारी अमावस्या असल्याने आगामी दोन दिवसात तालुक्‍यात पावसाचे प्रमाण वाढणार असल्याचा अंदाज आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. मुसळधार पावसाने तालुक्‍यातील मुख्य बाजारपेठा ओस पडल्या आहेत. 

गतवर्षीपेक्षा 300 मिमीने अधिक पाऊस 
गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी पावसाचा जोर कायम आहे. गतवर्षी या वेळी 2163 मिमी पाऊस तालुक्‍यात पडला होता. या वर्षी जुलैअखेर 2511 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी 300 मिमीने पाऊस अधिक आहे. या वर्षी पावसाने उशिरा सुरूवात केल्याने तो सरासरी भरून काढले की नाही याबाबत शंका होती मात्र पावसाने सर्वांचा अंदाज फोल ठरवत सरासरीपेक्षा अधिक कोसळून सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्‍का दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Konkan Rains flood situation in Sangmeshwar