
कोकणामध्ये पावसाळ्यात दुथडी भरून वाहणार्या नद्या उन्हाळ्यामध्ये कोरड्या शुष्क असतात. मात्र, तरीही ज्या ठिकाणी नद्यांना पाणी उपलब्ध आहे, ज्यांच्या खाजगी विहीरींनी पाणी उपलब्ध आहे असे शेतकरी उन्हाळी-पावसाळी हंगामात भातशेतीच्या जोडीने भाजीपाला लागवड करीत आहेत. त्यातून शेतकर्यांचे अर्थाजन होते आणि स्थानिक भाजीही ग्राहकाला उपलब्ध होत आहे. व्यवसायिक दृष्टीकोनातून शेती करणार्यांची संख्या तुलनेने कमी असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याला भाजीपाल्यासाठी घाटमाथ्यावरील बाजारपेठेवर अवलंबून रहावे लागत आहे. शेतीसह भाजीपाला लागवडीतून हमखास उत्पन्न मिळविण्याची रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकर्यांना संधी आहे. मात्र, त्यासाठी शेतीमध्ये स्वतः कष्ट उपसण्याची तयारी, सकारात्मक मानसिकता आणि व्यवसायिक दृष्टीकोनाची आवश्यकता आहे. ही संधी घेणारे काही शेतकरी आहेत. त्यांची यशोगाथा महत्वाची आहे. सद्यःस्थितीत रत्नागिरी जिल्ह्याला भाजीपाल्यासाठी पश्चिम महाराष्ट्रावर अवलंबून रहावे लागत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात भाजीपाला कोल्हापूर, सांगली, कर्हाड, मुंबई, पुणे, इस्लामपूर, बेळगाव येथून येतो. जिल्हा याच भागावर भाजीसाठी अवलंबून आहे. त्यात बदल घडतोय पण त्याची गती मंद आहे.
- राजेंद्र बाईत, राजापूर