
कोकण : पूर्वजांच्या समाधी पूजन परंपरेने कुटुंबाची वीण घट्ट
मंडणगड: शेकडों वर्षांपासून पूर्वापार चालत आलेली महाशिवरात्रीला पूर्वजांच्या समाधी पूजनाची परंपरा आजच्या विभक्त कौटुंबिक पद्धतीतही कुटुंबांची वीण कायम घट्ट करणारी ठरते. सुखदुःखात एकमेकांच्या मदतीला उभे राहणारे सर्वजण एकत्र येत असल्याने ही परंपरा कौटुंबिक महत्व अधोरेकीत करणारी आहे. ही प्रथा कोकणात महाशिवरात्रीला गावोगावी सर्वत्र तितक्याच श्रद्धेने जोपासण्यात आली.
पूर्वी कुटुंबातील व्यक्ती मृत झाल्यानंतर त्यांची आठवण म्हणून कुटुंबाच्या वडिलोपार्जित जागेवर समाधी बांधण्यात येत असे. आजही तालुक्यातील गावोगावी शेकडोंच्या संख्येने कलेचा उत्तम नमुना असणाऱ्या समाधी पाहायला मिळतात. महाशिवरात्रीला गावोगावी या समाधी पूजण्याची परंपरा आहे. कुलदैवताचे पूजन केल्यानंतर पूजनाचे ताट आणि घरी बनविलेले विविध पदार्थ घेवून घरातील सर्व मंडळी पूर्वजांच्या समाधी स्थळी जातात. समाधीवर वाढलेले गवत, झाडी, पालापाचोळा साफ करून त्या पाण्याने स्वच्छ करण्यात आल्या. समाधीवर मृत व्यक्तीची आठवण असणारी नक्षीकाम केलेले पाषाण साफ करण्यात आले. मोकळ्या जागेत महिलांनी चुन्याची रांगोळी, त्यावर दिवा, अगरबत्ती, फुले, हार ठेवले. हळद कुंकू वाहून चारही टोकांवर झेंडे रोवून त्यांचे विधिवत पूजन होते.
यावेळी प्रत्येकजण आपल्या आजी आजोबा, पणजी पणजोबा, वाडवडील अशा कुटुंबातील मृत झालेल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्या नावाने समाधीस्थळावर नतमस्तक होवून आशीर्वाद घेतात. मनावर कोरलेल्या आठवणींनी अश्रू रुपात प्रकट होतात. प्रदक्षिणा घालून त्यांना आदरांजली वाहण्यात येते. यावेळी होणाऱ्या संवादातून पूर्वजांनी कुटुंब, गाव, समाजासाठी केलेल्या अनेक कामे, गोष्टीं समजून येतात. समाधी पूजनामुळे तरुण पिढीला आपले नातेवाईक, पूर्वज उलगडतात. महाशिवरात्रीची ही परंपरा कुटुंबांना एकत्रित आणते. या परंपरेतून कौटुंबिक सलोखा राखला जातो.