कोकणात पर्यटनवाढीसाठी ही हवी तरतूद....

मुझफ्फर खान
Saturday, 14 March 2020

युती सरकारच्या काळात स्वतंत्र पर्यटन विकास महामंडळ स्थापन केले गेले नाही. त्यासाठी निधीचीही तरतूद केली गेली नाही.

चिपळूण (रत्नागिरी) : युती सरकारच्या काळात स्वतंत्र पर्यटन विकास महामंडळ स्थापन केले गेले नाही. त्यासाठी निधीचीही तरतूद केली गेली नाही. आता या शासनाने कोकण पर्यटन विकास करण्यासाठी व कोकणात पर्यटक कसे येतील, अशी योजना आखून निधीची तरतूद करावी, अशी मागणी चिपळूण- संगमेश्‍वरचे आमदार शेखर निकम यांनी केली.

भारतातील अनेक राज्याच्या अर्थव्यवस्था पर्यटनावर उभारलेल्या आहेत. कोकणाला ७२० किलोमीटरचा विस्तिर्ण समुद्रकिनारा लाभला असून सह्याद्री पर्वतरांगा, जंगले, जैवविविधता, नद्या, धबधबे, तलाव, प्राचिन वास्तू, तीर्थक्षेत्रे किल्ले, थंड हवेची ठिकाणे, आदी सारे असूनही अजूनही कोकण पर्यटनाची अवस्था दिनदुबळी आहे. २०१६ मध्ये विधान मंडळाच्या सभागृहात या संबंधात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी कोकणच्या गतीमान पर्यटन विकासासाठी स्वतंत्र कोकण पर्यटन विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली होती. 

हेही वाचा- ब्रेकिंग कोल्हापूर जिल्ह्यात आपत्ती घोषित : यात्रा,समारंभाना बंदी...

जगबुडी व वाशिष्ठी नद्या धोक्‍याच्या पातळीवर

तत्कालीन अर्थमंत्र्यांनी सुध्दा अर्थसंकल्प मांडताना या महामंडळासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात येईल, अशी ग्वाही दिली होती. परंतु या घोषणा हवेतच विरल्या आहेत. कोकण पर्यटनाच्या विकासासाठी स्थानिकांना रोजगार, समुद्रकिनारी हॉटेल्स याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्‍यकता आहे. जगबुडी व वाशिष्ठी या नद्या धोक्‍याच्या पातळीवर आहेत. जिल्ह्यात सतत होत असल्या अतिवृष्टीमुळे या नद्यांना नेहमी पूर येत असून कोकणात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे या नद्या पूर्ण क्षमतेने वाहत असतात.

 हेही वाचा- सोन्याच्या दरात कमालीची घसरण जाणून घ्या कोल्हापूरातील दर...

३०० ते ३५० पांडवकालीन मंदिरे

संगमेश्वर तालुक्‍यातील श्री क्षेत्र मार्लेश्वर, कसबा येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक, पांडवकालीन लेणी, विविध मंदिरे तसेच ओझरे येथील टिकळेश्वर मंदिर परिसराचा विकास होणे अत्यंत आवश्‍यक आहे. याकडे निकम यानी लक्ष वेधले.संगमेश्वर तालुक्‍याला फार मोठा ऐतिहासिक वारसा असून या तालुक्‍यामध्ये भगवानगड, प्रचितगड, सुंदरगड, महिपतगड इत्यादी शिवकालीन किल्ले आहेत. शिल्पकलेचा अद्वितीय अविष्कार असणाऱ्या या परिसरात सुमारे ३०० ते ३५० पांडवकालीन मंदिरे आहेत. राज्यातून हजारो पर्यटक याठिकाणी पर्यटनासाठी येत असतात. परंतू, बरेच गडकिल्ले व मंदिरे जीर्ण अवस्थेत असून त्याचे जतन व संवर्धन होणे पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. याकडे शासनाने विशेष लक्ष देण्याची आवश्‍यकताही निकम यानी प्रतिपादन केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Konkan Tourism Development kokan marathi news