कोकणातील पर्यटन व्यावसायिक आंदोलनाच्या पवित्र्यात

कोकणातील पर्यटन व्यावसायिक आंदोलनाच्या पवित्र्यात

मालवण - पर्यटन व्यावसायिकांच्या बांधकामांवर सीआरझेड कायद्यांतर्गत असलेली कारवाईची टांगती तलवार व अन्य पर्यटनविषयक प्रश्‍नांबाबत पर्यटन व्यावसायिकांनी आवाज उठवत आंदोलनाची भूमिका घेतली आहे. याबाबत समृद्ध कोकण संघटनेतर्फे कोकण रोजगार हक्क अभियानांतर्गत मंगळवारी (ता. १८) दुपारी दोनला जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस ते मालवण, तारकर्ली, देवबाग अशी भव्य कोकण विकास यात्रा काढण्यात येणार आहे.

 दुपारी चार ते सायंकाळी सात या वेळेत सिंधुदुर्ग रोजगार हक्क परिषद मालवण समुद्रकिनारी होणार आहे. पर्यटन व्यावसायिकांच्या विविध मागण्यांसाठी २५ जूनला मुंबई येथे आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढण्यात येईल, अशी माहिती वायरी बांध येथे झालेल्या पर्यटन व्यावसायिकांच्या बैठकीत देण्यात आली. वायरी बांध येथील नवीन दत्त मंदिरात पर्यटन व्यावसायिकांची बैठक झाली.

या वेळी अविनाश सामंत, देवानंद लोकेगावकर, दिलीप घारे, संदेश तळगावकर, घनश्‍याम झाड, महेश चोपडेकर, बाळू मुंडये, श्रीकृष्ण तळवडेकर, मुन्ना झाड, राजू मेस्त्री, दर्शन वेंगुर्लेकर, मंदार गोवेकर, प्रसाद माडये, शरद माडये आदी उपस्थित होते. देवबाग, तारकर्लीसह तालुक्‍यातील किनारपट्टीवरील पर्यटन व्यावसायिकांनी केलेली बांधकामे ही शासनाने सीआरझेड अधिनियमांतर्गत अनधिकृत बांधकामे ठरविल्यानंतर किनारपट्टीवरील सर्व पर्यटन व्यावसायिकांना बांधकामे काढण्याचे आदेश महसूल यंत्रणेला देण्यात आले. ही कारवाई रोखण्यासाठी व अन्य पर्यटनविषयक प्रश्‍नांबाबत महाराष्ट्र शासनाकडे दाद मागण्याकरिता जनआंदोलन उभारण्याची गरज आहे.

तालुक्‍यातील किनारपट्टी भागातील स्थानिक नागरिक गेली अनेक वर्षे पर्यटन उद्योगात आहेत. पर्यटन उद्योगातून हजारो बेरोजगारांना रोजगार मिळू लागला आहे. यातूनच शासनाच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा हातभार मिळाला. परंतु, शासन येथील स्थानिक पर्यटन व्यावसायिकांसाठी कायमच उदासीन राहिले आहे, असे या वेळी पर्यटन व्यावसायिकांनी सांगितले. मंगळवारी दुपारी दोनला जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस ते मालवण, तारकर्ली, देवबाग अशी भव्य कोकण विकास यात्रा काढण्यात येणार आहे. दुपारी चार ते सायंकाळी सात या वेळेत सिंधुदुर्ग रोजगार हक्क परिषद मालवण समुद्रकिनारी होईल, अशी माहिती समृद्ध कोकण संघटनेचे मालवण संघटक अविनाश सामंत यांनी दिली.

पर्यटन व्यावसायिकांच्या विविध मागण्यांसाठी २५ जूनला मुंबई येथे आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. यात कोकणातील डहाणू ते केरीपर्यंतचे पर्यटन व्यावसायिक सहभागी होतील, असेही सामंत यांनी सांगितले.

विविध मागण्या...
शासनाला याची जाग आणून देणे गरजेचे असून, २०१९ पर्यंतची सर्व पर्यटन बांधकामे अधिकृत करणे, स्वतंत्र कोकण पर्यटन प्राधिकरण निर्माण करणे, पर्यटन उद्योगाला भरघोस आर्थिक सहाय्य मिळविणे, भूमिपुत्रांना कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देणे, पर्यटन उद्योगाला सुलभ परवानग्या मिळणे आदी पर्यटन व्यावसायिकांच्या मागण्या आहेत. यासाठी समृद्ध कोकण संघटना यांच्यातर्फे कोकण रोजगार हक्क अभियान राबविण्यात येत आहे. 

मच्छीमारांचाही पाठिंबा
पर्यटन व्यावसायिकांच्या या आंदोलनाला मच्छीमारांचा पाठिंबा मिळेल, असे जिल्हा रापण संघाचे सचिव दिलीप घारे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com