
गळती काढण्यासाठी प्रकल्पाचे पोफळी येथील टप्पा 1 आणि 2 डिसेंबरमध्ये काही दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.
कोयना प्रकल्पाच्या सर्जवेलमधील गळती काढण्यासाठी हालचाली सुरु
चिपळूण : कोयना प्रकल्पाच्या सर्जवेलमधील गळती काढण्यासाठी प्रकल्पाचे पोफळी येथील टप्पा 1 आणि 2 डिसेंबरमध्ये काही दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. वीज निर्मितीचे संकट उभे राहून नये यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून चौथ्या टप्यातून पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती केली जाणार आहे. कोयना जलसिंचन विभागाच्या अधिकार्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
हेही वाचा - कर्करोगाशी तडफेने लढणाऱ्या मालवणी अभिनेत्रीची आव्हान पेलण्यासाठी आर्त साद...
कोयना प्रकल्पाच्या पहिल्या आणि दुसर्या टप्प्यात एकूण आठ पेल्टन टर्बाइन युनिटसह समान पॉवरहाऊस आहेत. दोन टप्प्यात प्रत्येकी चार टर्बाइन्स आहेत. पहिल्या टप्प्यासाठी प्रत्येकी 70 मेगावॅट आणि दुसर्या टप्प्यासाठी 80 मेगावॅट क्षमतेची प्रत्येकी चार टर्बाईन आहेत. यातून 600 मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते. नवजा येथे कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात नवजा टॉवर बांधण्यात आले आहे. या टॉवरमधील अंतर्भूत संरचनेतून धरणातील जलाशयाचे पाणी मुख्य शर्यतीच्या बोगद्यात नेले जाते. पुढे ते पाणी सर्जवेलच्या दिशेने प्रवास करते.
सर्जवेलमध्ये येणारे पाणी पुढे चार प्रेशर शाफ्टमध्ये विभागले गेले आहे. या प्रेशर शाफ्टच्या माध्यमातून टर्बाइन्सला पाणी पुरवठा केला जातो. त्यानंतर वीज निर्मिती होते. वीजनिमिर्तीनंतर हे पाणी बोगद्याद्वारे चौथ्या टप्याच्या दिशेने सोडले जाते. टप्पा एक आणि दोनच्या उभारणी दरम्यान सर्जवेल बांधण्यात आली होती. सध्या या सर्जवेलला गळती लागली आहे. गळती काढण्यासाठी डिसेंबरमध्ये टप्पा एक आणि दोन बंद करण्यात येणार आहे. गळती काढण्यासाठी किती कालावधी लागेल हे निश्चित नाही.
हेही वाचा - भक्ष्याच्या शोधात आली अन् विहिरीत पडली, भर पावसात रेस्क्यू मोहीम
या दरम्यान 600 मेगावॅट वीज निर्मिती कमी पडू नये यासाठी चौथा टप्पा पूर्णक्षमतेने चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चौथ्या टप्यात प्रत्येकी 250 मेगावॅट क्षमतेचे 4 टर्बाईन आहेत. चौथा टप्यातून केवळ मागणीच्या काळात म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी वीज निर्मिती केली जाते. मात्र टप्पा एक आणि दोनचे काम सुरू झाल्यानंतर ते पूर्णहोईपर्यंत पूर्ण क्षमतेने चालविला जाणार आहे.
"कोयना प्रकल्पाचे पोफळी येथील टप्पा एक आणि दोन बंद ठेवण्याबाबत महानिर्मिती कंपनीकडून अद्याप वेळापत्रक आलेले नाही. हे वेळापत्रक प्राप्त झाल्यानंतर गळती काढण्याबाबतच्या हालचाली सुरू होतील. डिसेंबरमध्ये गळती काढण्याचा प्रस्ताव आहे."
- कुमार पाटील, कार्यकारी अभियंता कोयना सिंचन
संपादन - स्नेहल कदम