Vidhansabha2019 : कुडाळमध्ये ‘हाय होल्टेज’ लढतीचे संकेत

Vidhansabha2019 :  कुडाळमध्ये ‘हाय होल्टेज’ लढतीचे संकेत

सावंतवाडी - कुडाळ विधानसभा मतदारसंघात शिवसेना आमदार वैभव नाईक आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यात पुन्हा ‘हाय होल्टेज’ लढतीची चिन्हे आहेत; मात्र येथून महाराष्ट्र स्वाभिमानतर्फे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत आणि सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत इच्छुक असल्याने त्यांची समजूत काढण्याची कसरत राणेंना करावी लागू शकते. यातच श्री. सावंत भाजपच्या मार्गावर असल्याच्या चर्चेमुळे राजकीय उत्कंठा शिगेला पोचली आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभेच्या अवघ्या तीन जागा असल्या तरी राजकारणाशी नारायण राणे यांचे नाव जोडले असल्याने येथील निवडणुकांकडे राज्याचे लक्ष लागून असते. आगामी विधानसभेत येथील राजकीय समीकरणे अनेक अर्थाने वेगळी असणार आहेत. २०१४ च्या लढतीत पहिल्यांदाच कुडाळ मतदारसंघाने राणेंना पराभव दाखवला. यानंतर त्यांचा राजकीय आलेख फारसा उंचावला नाही. उलट जिव्हारी लागणारे पराभव स्वीकारावे लागले. आता राणे भाजपचे खासदार आहेत.

‘महाराष्ट्र स्वाभिमान’ या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली आहे. त्यांचा एक नंबरचा राजकीय शत्रू असलेला शिवसेना पक्ष आणि भाजपची युती जवळपास पक्की झाली आहे. अशा स्थितीत त्यांची आणि स्वाभिमानची विधानसभा लढतीत काय भूमिका असणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. स्वतः राणे विधानसभा लढवणार का? याबाबतही प्रश्‍नचिन्ह आहे. 

हिर्लोक (ता. कुडाळ) येथे झालेल्या एका कार्यक्रमात आमदार नितेश राणे यांनी स्वतः राणे कुडाळमधून लढणार असल्याचे संकेत दिले. यानंतर कुडाळमधील संभाव्य ‘हाय होल्टेज’ लढाईची पुुन्हा चर्चा सुरू झाली. तसे झाल्यास पुन्हा एकदा शिवसेना आमदार नाईक आणि राणे यांच्यात टक्कर असेल; पण या वेळी हे राजकारण इतके सरळही असणार नाही. राणेंच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्यांनी जिल्हाभर कार्यकर्त्याची फळी तयार केली; मात्र स्वतःहून विधानसभेसाठी फारशी कोणी उघड इच्छा व्यक्त केली नव्हती. गेल्या पाच वर्षांत चित्र बदलले आहे. महाराष्ट्र स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत आणि जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी कुडाळमधून लढण्याची उघड इच्छा व्यक्त केली किंवा तसे संकेत दिले आहेत.

राणेंसमोर त्यांची समजूत काढण्याचे आव्हान असणार आहे. श्री. सामंत आणि श्री. सावंत यांची स्वतःची राजकीय ताकद आहे. यातील सामंत यांची मालवण तालुक्‍यावर चांगली पकड आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे काम स्वाभिमानला मालवणमधून चांगली मते मिळवून देणारे ठरले होते. त्यांना थोपवण्याबरोबरच विधानसभेत स्वाभिमानसाठी सक्रिय ठेवण्यात राणेंच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.

जिल्हा बॅंक अध्यक्ष सावंत दीर्घकाळ राणेंसोबत आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष, पक्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा बॅंक अध्यक्ष अशा पदांवर प्रभावी काम करत त्यांनी आपले वलय निर्माण केले आहे. ते सावंतवाडीतून विधानसभा लढवतील, अशी चर्चा होती; पण काही महिन्यांपूर्वी त्यांनी सावंतवाडी ऐवजी कुडाळमधून लढण्याचे संकेत दिले होते. राणेंची ‘कोअर व्होट बॅंक’ असलेल्या कणकवली तालुक्‍यातील ‘सावंत बेल्ट’वर त्यांचा प्रभाव आहे. ते जिल्हा परिषदेत आंब्रड (ता. कुडाळ) या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात.

कणकवलीतून विद्यमान आमदार नितेश राणेंची उमेदवारी निश्‍चित असल्याने त्यांनी कुडाळमधून लढण्याचे संकेत दिले होते; पण कुडाळमधून स्वतः राणे उमेदवार असतील तर सावंत यांची भूमिका काय असणार? याबाबत उत्सुकता ताणली गेली आहे. 

यातच श्री. सावंत भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या आठवड्यात होती. सावंत यांनी याचा इन्कार केला; मात्र यात थोडे तरी तथ्य असले तरी त्यांची नाराजी स्वाभिमाला दूर करावी लागणार आहे. कारण युतीच्या जागा वाटपात कणकवली मतदारसंघ भाजपकडे जातो. श्री. सावंत भाजपकडे गेले तर कणकवलीचे उमेदवार होऊ शकतात. तसे झाल्यास स्वाभिमानला त्यांच्या बालेकिल्ल्यात आव्हान उभे राहणार आहे.

राणेंना अंतर्गत इच्छुकांची समजूत काढण्याबरोबरच शिवसेनेचे आव्हानही पेलावे लागणार आहे. गेल्या पाच वर्षांत वैभव नाईक यांनी मतदारसंघ बांधला आहे. भाजपची साथ आणि सत्ताधारी असल्याची त्यांची जमेची बाजू आहे. यामुळे ही लढत ‘हाय व्होल्टेज’ होईल इतके नक्की.

काय असतील राजकीय गणिते?
राणेंनी वेळोवेळी भाजप आपला मित्र असल्याचे स्पष्ट केले. नितेश राणे मात्र तांत्रिकदृष्ट्या आजही काँग्रेसमध्ये आहेत. भाजपचा मित्रपक्ष शिवसेना राणेंच्या शत्रूच्या लिस्टमध्ये आहे. अशा स्थितीत स्वाभिमान युतीच्या विरोधात लढणार की वेगळा डावपेच आखणार, याबाबत उत्सुकता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com