कुडाळ महिला रूग्णालयाचे काम कशामुळे रेंगाळले ?

अजय सावंत
रविवार, 31 मे 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर भविष्यात वाढणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कुडाळ येथे होऊ घातलेल्या महिला रुग्णालयाचे सार्वजनिक बांधकाम व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली होती.

कुडाळ ( सिंधुदुर्ग ) - अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे येथील अद्ययावत महिला रूग्णालयाचा प्रश्‍न अद्याप रेंगाळला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे रुग्णालय कसे चालू होणार नाही याचे रडगाऱ्हाणे गाऊन दाखवले. कोरोनाच्या पार्श्‍ववभूमिवर अधिकाऱ्यांनी गांभीर्याने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे मार्गदर्शन घेऊन 10 एप्रिलपासूनच या रुग्णालयाचे अर्धवट राहिलेले पुढील काम सुरु केले असते तर आज या रुग्णालयाचा वापर करता आला असता, अशी प्रतिक्रीया सर्वसामांन्यातून उमटत आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर भविष्यात वाढणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कुडाळ येथे होऊ घातलेल्या महिला रुग्णालयाचे सार्वजनिक बांधकाम व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली होती. यावेळी अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. याच इमारतीच्या पाठीमागे भलीमोठी पाण्याची विहीर असून कठडा बांधण्याचे काम बाकी असल्याचे अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. त्यामुळे पाण्याची उपलबध्तता याठिकाणी होती.

यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी हे रुग्णालय किमान 40 ते 50 खाटांसहीत सुरु करण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या होत्या; परंतु त्याच वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे रुग्णालय कसे चालू होणार नाही याचे रडगाऱ्हाणे गाऊन दाखवले होते. जर कोरोनाच्या पार्श्‍ववभूमीवर अधिकाऱ्यांनी गांभीर्याने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे मार्गदर्शन घेऊन 10 एप्रिलपासूनच या रुग्णालयाचे अर्धवट राहिलेले पुढील काम सुरु केले असते तर आज किमान हे रुग्णालय काही प्रमाणात इतर बाबींसाठी वापरता आले असते. 

या रुग्णालयाचे भूमिपूजन सहा वर्षांपूर्वी खासदार नारायण राणे यांनी केले होते. जिल्ह्यात पावसाळ्यामध्ये सर्दी, ताप, हगवण, लेप्टो, माकडताप, स्वाईन फ्लू तसेच सरपटणाऱ्या प्राण्यांपासून चावा घेण्याचे प्रकार सुद्धा मोठ्या प्रमाणात होत असतात. त्यावेळी रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते. या बरोबरच यंदा कोरोना विषाणूशी लढा सुद्धा चालू आहे. त्यामुळे आधीच आरोग्य यंत्रणा प्रचंड व्यस्थ आहे व साधन सामुग्रीची कमतरता जाणवत आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या सूचनेचा आदर राखून या संदर्भात कार्यवाही सुरु केली असती तर कुडाळ महिला रुग्णालयाचा थोड्याफार प्रमाणात का होईना वापर करण्यात आला असता. खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांचेही रूग्णालय पुर्ण होण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला होता; मात्र अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे जिल्ह्यामध्ये आरोग्य यंत्रणा सुधारण्यास कसा अडथळा येतो, हे येथील महिला रुग्णालय जिवंत उदाहरण आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kudal Woman Hospital Work Pending Sindhudurg Marathi News