सिंधुदुर्गातील कुसूरचा पाझर तलाव "डेंजर झोन'मध्ये 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जुलै 2019

वैभववाडी - कुसूर-टेंबवाडी येथील पाझर तलावातून दोन ठिकाणाहून पाणी वाहत आहे. त्यामुळे हा तलाव डेंजर झोनमध्ये आला आहे. तलाव परिसरात वाढलेल्या दाट झाडीमुळे अधिकाऱ्यांना याची पाहणी करण्यातही अडचणी येत आहेत. 

वैभववाडी - कुसूर-टेंबवाडी येथील पाझर तलावातून दोन ठिकाणाहून पाणी वाहत आहे. त्यामुळे हा तलाव डेंजर झोनमध्ये आला आहे. तलाव परिसरात वाढलेल्या दाट झाडीमुळे अधिकाऱ्यांना याची पाहणी करण्यातही अडचणी येत आहेत. 

चिपळूण येथील तिवरे धरण फुटल्याचा फटका धरणाखालील सहा ते सात गावांना बसला. यामध्ये 23 जणांचा बळी गेला. या घटनेच्या अनुषंगाने लघु पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील लघु धरण, पाझर तलावांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. आज लघु पाटबंधारे विभागाचे जलसंधारण उपविभागीय अधिकारी एन. एन. चोडणकर हे कुसूर पाझर तलावाची पाहणी करण्यासाठी आले होते.

ग्रामसेवक जी. एस. नावळे, ग्रामस्थ सुभाष पाटील यांना घेऊन ते पाझर तलावापाशी गेले; परंतु तलावाच्या दोन्ही बाजूला वाढलेली घनदाट झाडीमुळे त्यांना तलावाची तपासणीच करता आली नाही; मात्र ज्या ठिकाणाहून शक्‍य होते त्या ठिकाणाहून ते तलावाच्या पायथ्याशी पोचले. तेथे त्यांना धक्कादायक प्रकार पाहिला मिळाला. तलावातून दोन ठिकाणाहून मोठे पाणी वाहत असल्याचे त्यांच्या निर्दशनास आले. याशिवाय आऊट लेट व्हॉल्व तुटून पडलेला त्यांना दिसला. त्यामुळे तलावातून येणार पाणी नेमके कुठून येते हे त्यांना समजू शकलेले नाही. जर हे पाणी तलावाच्या भिंतीतून येत असेल तर ते धोकादायक ठरू शकते. 

झाडीचा अडसर 
सध्या हे पाझर तलाव धोकादायक स्थितीत असल्याचे बोलले जात आहे. या तलावाची तपासणी तातडीने करणे आवश्‍यक आहे; परंतु जर तलावाची तपासणी करावयाची असेल तर तलावाच्या दोन्ही बाजूची झाडेझुडपे तोडणे आवश्‍यक आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने ही झुडपे तोडावीत. त्यानंतरच तलावाची तपासणी करता येईल. अशा आशयाचे पत्र त्यांनी स्थानिक लघु पाटबंधारे विभाग आणि ग्रामपंचायतीला दिले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kusur water lake in Danger zone Sindhudurg