esakal | रत्नागिरीत राजीनामा देण्यासाठी तिच्यावर टाकला दबाव परंतु ..

बोलून बातमी शोधा

lakshmi shivalkar strong not to resignation in ratnagiri kokan marathi news

पक्षविरोधी भूमिका घेतल्याने राजा काजवे यांच्यावर झालेल्या कारवाईचा विषय सध्या गाजत असताना आता आणखी... 

रत्नागिरीत राजीनामा देण्यासाठी तिच्यावर टाकला दबाव परंतु ..
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राजापूर  ( रत्नागिरी ) :  पक्षविरोधी भूमिका घेतल्याने राजा काजवे यांच्यावर झालेल्या कारवाईचा विषय सध्या गाजत असताना नाणार प्रकल्पाचे समर्थन केल्यामुळे आपल्यावर जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देण्यासठी पक्ष नेतृत्वाकडून दबाव टाकला जात असल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेच्या सागवे जिल्हा परिषद गटाच्या सदस्या लक्ष्मी शिवलकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला. जनतेतून निवडून आलो असून कोणी कितीही आपल्यावर दबाव टाकला तरी, आपणे सदस्यत्वपदाचा राजीनामा देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  

नाणार रिफायनरी विरोधात शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतलेला असताना तालुक्‍यातील सागवे विभागातील शिवसैनिकांनी रिफायनरी प्रकल्पाचे जोरदार समर्थन केले आहे. त्यावरून शिवसेनेतील अंतर्गंत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. या साऱ्या घडामोडीमध्ये नाणारबाबत पक्षविरोधी भूमिका घेतल्याबद्दल श्री. काजवे यांची सागवे विभागाच्या विभागप्रमुखपदावरून दोन दिवसांपूर्वी उचलबांगडी झाली. त्याच्या निषेधार्थ सागवे विभागातील शाखाप्रमुख आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी सामुहिक राजीनामे देवून पक्ष नेतृत्वाच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर यांनी सागवे विभागाची कार्यकारीणी बरखास्त केल्याचे जाहीर केले.

हेही वाचा- ...त्यामुळे झालीय शिवसेनेची कोंडी

सेनेचे वरिष्ठ नेते दबाव टाकत आहेत

या साऱ्या घडामोडी सुरू असताना आता सौ. शिवलकर यांच्यावर जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देण्यासाठी सेनेचे वरिष्ठ नेते दबाव टाकत असल्याचे पुढे आले आहे.नाणारवरून सागवे विभागामध्ये घडलेल्या घडामोडींच्या अनुषंगाने सौ. शिवलकर यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. या भागाच्या विकासासह बेरोजगारी दूर करण्यासाठी प्रकल्पाची आवश्‍यकता असल्याचे येथील लोकांचे मत असून त्यांच्या मताशी आपण सहमत आहोत.

हेही वाचा- कासव पिल्लांचा `येथे` जन्मसोहळा

सेनेत पेटलेला वाद चिघळण्याची शक्‍यता

त्यातूनच नाणार रिफायनरी प्रकल्पाचे आपण समर्थन केल्याचा खुलासा शिवलकर यांनी केला. प्रकल्पाचे समर्थन केल्यामुळे आपल्यावर संघटनेकडून जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देण्यासाठी दबाव टाकला जात आहे. मात्र आपण कोणच्याही दबावाला बळी न पडता सदस्यत्वाचा राजीनामा देणार नसल्याचे त्यांनी निक्षून सांगितले. मात्र या गौप्यस्फोटामुळे नाणारच्या मुद्यावरून सेनेत पेटलेला वाद अधिकच चिघळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.