लालपरीचा परराज्यात तिर्थयात्रेचा पहिला प्रयोग

प्रकाश जोशी
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

चिपळूण - खासगी वाहतुकदारांच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी चिपळूण आगाराने परराज्यामध्ये तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी एसटी यात्रा सुरू केली आहे. पहिली यात्रेकरूची एसटी गुजरात राज्यात रवाना झाली. आगाराने पहिल्यांदाच हा प्रयोग केला आहे.

चिपळूण - खासगी वाहतुकदारांच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी चिपळूण आगाराने परराज्यामध्ये तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी एसटी यात्रा सुरू केली आहे. पहिली यात्रेकरूची एसटी गुजरात राज्यात रवाना झाली. आगाराने पहिल्यांदाच हा प्रयोग केला आहे. प्रवाशांना उत्तम सुरक्षा, अपघाती विमा संरक्षण व अत्यंत कमी प्रवास खर्च ही त्याची वैशिष्ट्ये आहेत.

पूर्वी केवळ पंढरपूर तीर्थक्षेत्रासाठी जादा गाड्या सोडल्या जात होत्या. पण आता अनेक तिर्थक्षेत्रांना भेटीची सोय या प्रयोगातून केली गेली आहे. परराज्यात पूर्वी एसटी जात नव्हती. चिपळूण आगाराने खासगी यात्रा कंपनीच्या स्पर्धेत एसटी गाडी उतरवण्याचे ठरवले. त्यासाठी एसटी प्रशासनाने आवश्यक औपचारिक परवाने व परवानग्याची पूर्तता करून दिली. 

विवाह प्रसंगासाठीच्या प्रासंगिक कराराचे स्वरुप बदलून तीर्थयात्रेचे नियोजन केले गेले. गुजरात भागात तीर्थक्षेत्रांना भेटी देण्यासाठी एसटी सेवा द्यावी, अशी प्रवाशांची मागणी होती. तसेच त्यासोबत आरटीओकडून परवान्याची पूर्तता करून घेतली. संकटाच्या किंवा अडचणीच्या स्थितीत संबंधित राज्यातील एसटी प्रशासन जादा गाडी उपलब्ध करणे, मदतीची सोय करणे, इंधन भरणे आदी बाबीसाठी मदत करणार आहे. सर्व राज्यातील एसटी यंत्रणेत समन्वय साधणार्‍या दिल्लीच्या अ‍ॅस्ट्रो या मध्यवर्ती यंत्रणेने त्यासाठी आवश्यक सूचना सर्व राज्यातील एसटी यंत्रणेला दिल्या आहेत. त्यानुसार चिपळूण आगाराने गुजरात तिर्थयात्रेला पहिली गाडी सोडली आहे. परिवर्तनचे नवीन मॉडेल लालपरी त्यासाठी उपलब्ध केली आहे. 

विमा संरक्षणासह मानसी दोन हजार खर्च

या गाडीचा प्रवास खासगी वाहनाच्या तुलनेत अत्यंत स्वस्त आहे. तसेच प्रवाशांना विमा संरक्षणही आहे. गुजरातला गेलेल्या यात्रेकरुंना केवळ मानसी दोन हजार रुपये खर्च होणार आहे. प्रवाशांसाठी अत्यंत कमी दरात ही सेवा उपलब्ध झाली आहे. 

प्रासंगिक कराराप्रमाणे तीर्थयात्रेसाठी प्रवाशांच्या मागणीवरून लालपरी गाडी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पद्धतीने 44 प्रवाशांची मागणी आली तर सेवा दिली जाऊ शकते

- संदीप पाटील, आगारप्रमुख, चिपळूण एसटी आगार

Web Title: Lalpari on other state pilgrimage