रत्नागिरीत 'या' ठिकाणी एमआयडीसीसाठी 998 हेक्‍टरात भूसंपादन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

रत्नागिरी - प्रदूषणाच्या मुद्द्यावरून विविध उद्योगांना मोठ्या प्रमाणात विरोध होत असतानाच रत्नागिरीत विविध उद्योग सुरू करण्यासाठी वाटद येथे औद्योगिक विकास (एमआयडीसी) प्रकल्प उभारण्यासाठी 998 हेक्‍टर जागेच्या भूसंपादनाची अधिसूचना काढली आहे. जागा संपादित करण्याचे आदेश भूसंपादन विभागाचे महाव्यवस्थापकांनी रत्नागिरीच्या एमआयडीसी अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

रत्नागिरी - प्रदूषणाच्या मुद्द्यावरून विविध उद्योगांना मोठ्या प्रमाणात विरोध होत असतानाच रत्नागिरीत विविध उद्योग सुरू करण्यासाठी वाटद येथे औद्योगिक विकास (एमआयडीसी) प्रकल्प उभारण्यासाठी 998 हेक्‍टर जागेच्या भूसंपादनाची अधिसूचना काढली आहे. जागा संपादित करण्याचे आदेश भूसंपादन विभागाचे महाव्यवस्थापकांनी रत्नागिरीच्या एमआयडीसी अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

जिल्ह्यात सात औद्यागिक वसाहती आहेत. उद्योगांसाठी जागाच शिल्लक नसल्यामुळे विकास खुंटला आहे. यापूर्वी नाणार येथील रिफायनरी प्रकल्प उभारणीसाठीही राजापूरसह रत्नागिरीतील वाटद येथे जागेची पाहणी करण्यात आली होती. एमआयडीसी क्षेत्रात नवीन उद्योगांना चालना देण्यासाठी शासनाने मेक इन महाराष्ट्र संकल्पना राबविली आहे. कोकणात मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरू असून काही ठिकाणी मोठी बंदरे विकसित होत आहेत. लवकरच कोकण रेल्वेचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरण होत आहे. त्याचा फायदा माल वाहतुकीला होऊ शकतो. हे लक्षात घेऊन अनेक उद्योजकांच्या नजरा कोकणातील मोकळ्या जागांकडे वेधले आहे.

रत्नागिरी तालुक्‍यातील वाटद येथील वाटद, मिरवणे, आगरनरळ या परिसरातील सुमारे सातशे हेक्‍टर जमिनीवर एमआयडीसी उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोकण रेल्वेकडून येथे रेल्वेमार्ग उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ही बाब नव उद्योजकांच्या पथ्थ्यावर पडू शकते. त्यानुसार वाटद औद्योगिक वसाहतीसाठी वाटद, मिरवणे, कळझोंडी, कोळीसरे व गडनरळ या भागातील 997 हेक्‍टर खाजगी तसेच कोळीसरे, कळझोंडी येथील 0.090 हेक्‍टर सरकारी क्षेत्रात औद्योगिक विकासासाठी जागा अधिग्रहित करण्यात येणार आहे.

वाटदला औद्योगिक क्षेत्र जाहीर करून अधिसूचित करण्यास मान्यता दिली असून अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. त्या क्षेत्राकरीता पाण्याचे आरक्षण प्राप्त करून तसेच भूसंपादन व विकास कामावरील खर्च लक्षात घेऊन देणारा दर तसेच उद्योजकांच्या वाटप विचारात घेऊन त्यावर कार्यवाही लवकरच करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात यावा असे पत्राद्वारे कळवण्यात आले आहे. त्यानुसार याबाबत जिल्हाधिकारी यांनी संबंधित भूसंपादन अधिकारी यांना कळविण्यात यावे अशी सूचना केली आहे. 

पावणेदोनशे उद्योग बंद 
रत्नागिरी जिल्ह्यातील एमआयडीसीमध्ये उपलब्ध 1 हजार 912 एकर भूखंडापैकी 1 हजार 548 एकर भूखंडांचे वाटप झाले आहे. त्यावर 786 उद्योग सुरू असून पावणेदोनशे उद्योग बंद आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Land acquisition of 998 hectare for MIDC at Watad