मालमत्ता न जाताही मोबदला दिलाच कसा?

नंदकुमार आयरे
Saturday, 5 December 2020

या सुनावणीत आयुक्तांनी महामार्ग चौपदरीकरणाबाबत असलेल्या तक्रारी जाणून घेतल्या. कुडाळ प्रांत कार्यालयातील दोघा अधिकाऱ्यांबाबत असलेल्या तक्रारींबाबतही म्हणणे ऐकून घेतले.

सिंधुदुर्गनगरी - मालमत्ता न जाताही महामार्ग चौपदरीकरणात मोबदला उचलण्यात आला. अशी तक्रार करत महामार्ग चौपदरीकरण सुनावणीत आयुक्त समितीसमोर उपस्थित लोकप्रतिनिधींनी तक्रारीचा पाढा वाचत चौकशी करण्याची मागणी केली. 

मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण प्रश्‍नावरील सुनावणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात काल (ता.3) घेण्यात आली. या सुनावणीसाठी कोकण भवनमधून आयुक्त समिती आली होती. अप्पर आयुक्त सोनाली मुळे यांच्यासह विविध विभागातील पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांचा या समितीत समावेश होता. या सुनावणीत आयुक्तांनी महामार्ग चौपदरीकरणाबाबत असलेल्या तक्रारी जाणून घेतल्या. कुडाळ प्रांत कार्यालयातील दोघा अधिकाऱ्यांबाबत असलेल्या तक्रारींबाबतही म्हणणे ऐकून घेतले. महामार्ग चौपदरीकरणाबाबत कुडाळसह अन्य तालुक्‍यातून तक्रारी करण्यात आल्या होत्या.

विशेष म्हणजे कुडाळ मालवणचे शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी चौपदरीकरण मोबदलावरून कुडाळच्या प्रांताधिकारी यांच्यावर आरोप करून तक्रार केली होती. या तक्रारीनंतर महामार्ग चौपदरीकरण मोबदला विषय खूपच गाजला. त्यानंतर शिवसेनेसह राष्ट्रवादी, मनसे आदी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी चौपदरीकरण मोबदला प्रश्नावर चौकशीची मागणी केली होती. त्यावरून पालकमंत्री उदय सामंत यांनी याबाबत चौकशी करण्यात येईल अशी घोषणा केली होती. त्या अनुषंगाने कोकण भवन आयुक्त कार्यालयाने अप्पर आयुक्त सोनाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी समिती नेमली. त्या चौकशी समितीने काल (ता.3) येथील जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रारदाराना बोलावून त्यांचे म्हणणे जाणून घेतले. दिवसभर ही सुनावणी झाली.

तक्रारदारांना वेगवेगळ्या वेळा देण्यात आल्या होत्या. तक्रारदारांमध्ये आमदार नाईक यांच्यासह माजी आमदार मनसेचे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर, शिवसेनेचे कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांच्यासह पिंगुळी येथील प्रकल्पग्रस्त आदींचे म्हणणे यावेळी ऐकून घेण्यात आले. महामार्ग चौपदरीकरणात ज्याच्या मालमत्ता गेल्या नाहीत अशांनाही मोबदला काढण्यात आला आहे. तो कसा काढण्यात आला? याला जबाबदार कोण ? दोषींवर कारवाई करा अशी मागणी या सुनावणीत राष्ट्रवादीचे भास्कर परब यांनी केली. 

अनेक तक्रारी, निर्णयाकडे लक्ष 
जेवढी मालमत्ता गेली त्यापेक्षा दुप्पट तिप्पट मालमत्ता घेऊन मोबदला लाटला असल्याचे तक्रारी यावेळी करण्यात आल्या. चौपदरीकरणाचा हक्काचा मोबदला देण्यावरून कुडाळच्या प्रांत कार्यालयातून जो चालढकलपणा, अनियमितपणा आणि खोळंबा केला जातो याबाबतही तक्रारी करण्यात आल्या. या सर्व तक्रारदार यांच्या तक्रारी यावेळी प्रत्यक्ष ऐकून घेण्यात आल्याने आता याबाबत कोणता निर्णय घेण्यात येतो याकडे लक्ष लागून राहिले आहे.  

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Land Acquisition Compensation issue konkan sindhudurg