...तर बळजबरीने जमिने घेण्याचा प्रयत्न हाणून पाडू! कुणी दिलाय इशारा?

सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 July 2020

शासनस्तरावरून दोनशे रूपये गुंठे या अल्पशा भावाने जमिनी घेण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे या भागात विरोध झाला. ताज ग्रुपकडे 103 एक जमिन देण्याचे ठरले. 

शिरोडा (सिंधुदुर्ग) - वेळागरवाडीमधील सर्व्हे नंबर 39 मधील स्थानिक भूमिपुत्रानी केंद्र शासनाच्या न्यास न्याहारी योजनेद्वारे शासकीय अनुदान मिळाले नसताना गेल्या दहा-बारा वर्षात हा भाग विकसित केला असून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षीत करणारे केंद्र बनले आहे. उलट ताज ग्रुपने ताब्यात असलेल्या जमिनीत गेल्या 28 वर्षात काहीही केलेले नाही ही वस्तुस्थिती विचारात घेता पुनश्‍च बळजबरीने जमिनी घेण्याचा प्रयत्न हाणून पाडला जाईल, असा निर्धार येथील वेळागर सर्व्हे नं. 39 मधील निषेध दिन सभेत व्यक्‍त करण्यात आला. 

कोणतीही पूर्व नोटीस न बजावता 22 जुलै 1992 ला सर्व्हे नंबर 39 मध्ये शासनातर्फे सर्व्हेक्षण काम करण्यास स्थानिक भूमिपुत्रानी जोरदार संघटीतपणे विरोध केला. त्यावेळी पोलिसांनी भूमिपुत्रासह लोकप्रतिनिधी, हितचिंतक वगैरेंवर अमानुष लाठीहल्ला केला होता. त्यादिवसापासून सर्व्हे नंबर 39 मध्ये 22 जुलैला हा लाठीहल्ला निषेध दिन पाळला जातो. बुधवारी (ता.22) सायंकाळी माजी सभापती तथा सर्व्हे नंबर 39 संघर्ष समितीचे सल्लागार जयप्रकाश चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष आजू अमरे, उपाध्यक्ष समीर भगत, सहाय्यक सचिव शेखर भगत, प्रकाश भगत, आग्नेल खोज, आब्राख मेनास, सुधीर भगत, आनंद अमरे, मदन अमरे आदी उपस्थित होते. 

श्री. चमणकर म्हणाले, ""शासनाच्या पर्यटन खात्यातर्फे सिंधुदुर्ग किनारपट्टी विकसीत करण्याचे होऊ घातले आहे. त्यास पाठिंबा राहील. आपल्या भागाचा विकास होईल तसेच स्थानिक युवकांना रोजगार मिळेल या आशेने जमिनी देण्याचे ठरले; परंतु शासनस्तरावरून दोनशे रूपये गुंठे या अल्पशा भावाने जमिनी घेण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे या भागात विरोध झाला. ताज ग्रुपकडे 103 एक जमिन देण्याचे ठरले. 

विकासकामाला विरोध 
सर्व्हे नंबर 39 हे क्षेत्र गावठण क्षेत्र बळजबरीने संपादन करण्याचा प्रयत्न झाला; मात्र जनतेचे प्रक्षोब्ध आंदोलन आणि या आंदोलनाला सर्वस्तरावरून मिळालेला पाठिंबा यामुळे संपादन प्रक्रियेला शासनाला स्थगिती देणे भाग पडले होते. स्थानिक भूमिपूत्रांनी न्यास न्याहारी योजनेद्वारे स्वखर्चाने या भागात पर्यटनस्थळ उभे करून परिसराला महत्त्व प्राप्त करून दिले आहे. म्हणून बळजबरीने जमिनी घेण्याचा प्रयत्न झाल्यास तो हाणून पाडू.'' अध्यक्ष आजू अमरे यांनी जोपर्यंत सर्व्हे नंबर 39 क्षेत्र वगळले जात नाही तोपर्यंत ताज ग्रुपच्या विकासकामाला विरोध राहिल, असा इशारा दिला. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: land issues velagr wadi konkan sindhudurg