सिंधुदुर्ग : भुईबावडा घाट खचण्याची भीती 

एकनाथ पवार
Saturday, 7 September 2019

वैभववाडी - करूळ घाटरस्त्याला पर्याय असलेला भुईबावडा घाट दिवसेंदिवस ढासळत चालला आहे. दरडीचा धोका अधिक असलेल्या या घाटाला सद्यस्थितीस खचण्याच्या धोका अधिक संभवत आहे. त्यामुळे या घाटरस्त्याच्या पुर्नबांधणीची दुष्टीने ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. 

वैभववाडी - करूळ घाटरस्त्याला पर्याय असलेला भुईबावडा घाट दिवसेंदिवस ढासळत चालला आहे. दरडीचा धोका अधिक असलेल्या या घाटाला सद्यस्थितीस खचण्याच्या धोका अधिक संभवत आहे. त्यामुळे या घाटरस्त्याच्या पुर्नबांधणीची दुष्टीने ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. 

खारेपाटण - गगनबावडा मार्गावरील भुईबावडा घाट हा साधारणपणे साडेआठ किलोमीटर लांबीचा आहे. यातील दोन किलोमीटर अतंर हे अतिशय धोकादायक मानले जाते. एकीकडे शेकडो फुट खोल दरी आणि दुसरीकडे डोक्‍यावर कित्येक फुट उंचीच्या दरडी, अशी स्थिती या दोन किलोमीटर अतंरावर आहे. त्यामुळे पावसाळ्यात या घाटातून प्रवास करणे अतिशय जिकीरीचे मानले जाते. भुईबावडा घाटरस्त्याने करूळ घाटाच्या तुलनेत वाहतूक कमी असली तरी हा त्या घाटाला पर्यायी घाट म्हणून ओळखला जातो. याशिवाय खारेपाटण, उंबर्डे, भुईबावडा, पाचल परिसरातील वाहनचालक या घाटालाच पसंती देतात. 
यावर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीचा या घाटरस्त्याला मोठा फटका बसला. आतापर्यत दरडी कोसळण्याचा धोका असलेला हा घाटरस्ता आता खचण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

घाटरस्याला 50 मीटरपेक्षा अधिक लांबीची भेग पडली असुन ही भेग सद्या रूंदावत आहे. त्यामुळे हा रस्ताच दुभंगण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. यापुर्वी सुध्दा एक दोन ठिकाणी अशाच पध्दतीने रस्ता खचला होता. त्यांची दुरूस्ती होते न होते तोच पुन्हा रस्त्याला भेग पडल्यामुळे या घाटरस्त्याच्या भविष्यातील वाटचालीविषयी शंका निर्माण होवु लागली आहे. रस्ता खचण्यासोबतच संरक्षक कठडे ठिसुळ झालेले आहेत. त्यामुळे भुईबावडा घाट सुरक्षेचे दुष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. 

या घाटरस्त्यापैकी दोन किलोमीटर रस्ताच अधिक धोकादायक आहे. रस्त्याचा बांधकाम विभागाने परिपुर्ण आराखडा बनविण्याची गरज आहे. घाटात अजुनही तीस ते पस्तीस ठिकाणे मोकळी आहेत. तर काही ठिकाणी असलेले कठडे हे जीर्ण झालेले आहेत. दगड रचलेले हे आपसुकच कोसळताना दिसत आहेत. त्यामुळे या सर्वच ठिकाणी मजबुत संरक्षक कटडे उभारण्याची गरज आहे. 

क्रॅश बॅरियर्सची गरज 
भुईबावडा घाटात साधारणपणे 50 हुन अधिक मोकळी ठिकाणे आहेत. यातील तीस ते पस्तीस ठिकाणे धोकादायक आहेत. अपघात टाळण्यासाठी क्रॅश बॅरियर्स उभारण्याची गरज आहे. तर दहा ते पंधरा ठिकाणी संरक्षक भिंती बांधण्याची गरज आहे. 

गटारातील गाळ उपसणे आवश्‍यक 
घाटरस्त्यालगत असलेल्या गटारांमध्ये सध्या पावसाने वाहुन आलेला गाळ मोठ्या प्रमाणात साचला आहे. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहते. याच पाण्यामुळे रस्ता खचण्याची प्रकिया सुरू होते. त्यामुळे घाटरस्त्यातील पाण्याचा निचरा करणे ही अत्यंत निकड बनली आहे. 

भुईबावडा घाटात रस्त्याला भेग पडली आहे. तेथे पर्यायी रस्ता तयार करून वाहतूक सुरू आहे. सुरक्षेच्या दृष्टीने बॅरेलमध्ये दगड भरून रस्त्याकडेला रचुन ठेवली आहेत. जिथे भेग पडली आहे. त्या रस्त्याची पुर्नबांधणीचा प्रस्ताव तत्काळ तयार करण्यात येईल. पावसात हे काम करणे शक्‍य नाही. त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर हे काम हाती घेण्यात येईल. 
- पी. जी. तावडे,
उपविभागीय अधिकारी, सा.बां.विभाग, वैभववाडी.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Land slice issue in Bhuibawada Ghat Special story