एक दोन नव्हे, तब्बल पावणेतीन कोटींचा `चुना`, असा व्यवहार काय होता?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जून 2020

कंपनीने विश्‍वास ठेवून कांबळी यांनी सांगितल्याप्रमाणे जागा मालकांच्या नावे सुमारे 2 कोटी 77 लाख 37 हजार इतक्‍या रकमेचे डिमांड ड्राफ्ट स्वरूपातील रक्कम जमा केली.

ओरोस (सिंधुदुर्ग) - जागा खरेदी करून देतो असे सांगून गोवा येथील मारगॉक्‍स हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची 2 कोटी 77 लाख 37 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आचरा येथील संजय दत्ताराम कांबळी, त्याची पत्नी सौ. पूजा संजय कांबळी, भाऊ विलास दत्ताराम कांबळी, रमेश गणपत आडकर व संतोष गावकर यांच्याविरोधात देवगड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आपल्याला अटक होऊ नये, यासाठी संजय कांबळी यांनी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. 

तक्रारीत म्हटले आहे, की मारगॉक्‍स कंपनीच्या गोवा येथील मुख्य कार्यालयाकडून सिंधुदुर्गातील प्रोजेक्‍टसाठी जागा खरेदीच्या इराद्याने 2006 ते 2012 या कालावधीत संजय दत्ताराम कांबळी हे कंपनीच्या संपर्कात आले. त्यानंतर त्यांनी समुद्रकिनारी जागा आहे, असे भासवून कंपनीकडून जागा देण्याच्या अटीवर कुलमुखत्यार पत्र तयार करून घेतले. याच दरम्यान संजय कांबळी यांनी देवगड तालुक्‍यातील आडबंदर, मुणगे, हिंदळे, मोरवे या भागातील जमिनी असल्याचे सांगत त्या जमिनीचा सहहिस्सेदार असल्याचे कंपनीला भासवून कंपनीला कागदपत्रे दाखविली. त्यावर कंपनीने विश्‍वास ठेवून कांबळी यांनी सांगितल्याप्रमाणे जागा मालकांच्या नावे सुमारे 2 कोटी 77 लाख 37 हजार इतक्‍या रकमेचे डिमांड ड्राफ्ट स्वरूपातील रक्कम जमा केली.

ही रक्कम कांबळी याने वेळोवेळी उचल करून घेतली; मात्र ही जागा कंपनीच्या नावे करण्याबाबत टाळाटाळ सुरू केली. कंपनीच्यावतीने वेळोवेळी ही जागा कंपनीच्या नावे करण्याबाबत संधी देण्यात आली; मात्र कांबळी यांनी ही जागा या आपल्या नावावर केल्या. तर त्यातील काही जागा पत्नी पूजा संजय कांबळी, भाऊ विलास दत्ताराम कांबळी, मेहुना रमेश गणपत हडकर व नातेवाईक संतोष गावकर यांच्या नावे केली. यानंतर कंपनीने सातत्याने कांबळी यांना जागा कंपनीच्या नावावर करण्याबाबत विचारणा केली; मात्र कांबळी हा कंपनीच्या नावावर जागा करण्यास टाळाटाळ करू लागला. अखेर कंपनीने पोलिस ठाण्यात धाव घेतली.देवगड पोलिसांनी संशयितांवर गुन्हे दाखल केले. संशयितांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: land transaction 53 crore Fraud konkan sindhudurg