मध्य रेल्वे मार्गावर भूस्खलन; कोकण रेल्वे ठप्प 

मध्य रेल्वे मार्गावर भूस्खलन; कोकण रेल्वे ठप्प 

रत्नागिरी - मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे मार्गावर पेणपासून (जि. रायगड) काही अंतरावर जीतेजवळ दरड कोसळून कोकण रेल्वे मार्ग ठप्प झाला. दुशमी रेल्वे गेट परिसरात भूस्खलन झाले असून रेल्वे मार्गावर मातीचा ढिगारा आला. सकाळी साडेसहा वाजल्यापासून राजधानी एक्‍स्प्रेस या परिसरात अडकल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला.

काही गाड्या पुन्हा मडगावकडे वळविण्यात आल्या आहेत, तर काही टप्प्याटप्प्याने धावत आहेत. कोकण रेल्वे मार्ग सोमवारपर्यंत (ता. 5) सुरू होईल असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

रविवारी सकाळच्या सुमारास मध्य रेल्वेच्या हद्दीत दुशमी येथे भूस्खलन झाले. सर्वच्या सर्व डोंगर कोकण रेल्वे मार्गावर कोसळला होता. मुंबईहून येणाऱ्या आणि कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या सगळ्या गाड्या ठिकठिकाणी थांबविल्या होत्या. रविवारी सुट्टी असल्यामुळे मुंबईतून निघालेले चाकरमानी गाडीतच अडकले. 

कोकण रेल्वे मार्गावर रविवारी दिवसभरात 25 हून अधिक गाड्या धावत होत्या. मत्स्यगंधा, जनशताब्दी पुन्हा माघारी वळवून मडगावकडे पाठविण्यात आल्या. रत्नागिरी स्थानकात मांडवी एक्‍स्प्रेस थांबलेली होती. एकीकडे मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे कोकण रेल्वे ठप्प झाल्यामुळे प्रवाशांना रेल्वेस्थानकातच थांबनू राहावे लागले. 

कोकण रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार दादर-रत्नागिरी, पुणे-एर्नाकुलम, दिवा-सावंतवाडी या गाड्या रद्द केल्या. मांडवी एक्‍स्प्रेस रत्नागिरीत, नेत्रावती संगमेश्‍वरला, कोइमबतुर चिपळूणला, खेड स्थानकात चंदिगड एक्‍स्प्रेस, मंगला वीर स्थानकात, जनशताब्दी कुडाळ स्थानकात थांबवून ठेवण्यात आली होती. मुंबईकडे जाणारी कोकणकन्या रद्द करण्यात आली. दोन गाड्या अन्य मार्गान वळविण्यात आल्या. सावंतवाडी-दिवा गाडी टर्मिनेट करण्यात आली आहे. 

एसटीची मदत 
गाड्या रद्द झाल्यामुळे आणि रत्नागिरी स्थानकात काही गाड्या उभ्या केल्यामुळे अडकलेल्या प्रवाशांचे पैसे कोकण रेल्वे प्रशासनाकडून परत देण्याचे काम सुरू होते. रत्नागिरी स्थानकात अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी भाजप जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांच्यासह सचिन वहाळकर, उमेश कुलकर्णी, प्रशांत डिंगणकर, विकास धाडस सावंत आदी धावले. अनेक प्रवाशांना मुंबईकडे किंवा सिंधुदुर्गकडे जाण्यासाठी एसटीची मदत घेण्यात आली होती. 

सहा वर्षांनी पुनरावृत्ती 
यापूर्वी निवसर, पोमेंडीसह विविध ठीकाणी कोकण रेल्वे मार्गावर दरडी कोसळून मार्ग ठप्प होण्याचे प्रकार घडत होते; मात्र त्यावर कोकण रेल्वे प्रशासनाने मात केली होती. गेल्या सहा वर्षात अशाप्रकारे अर्ध्या दिवसाहून अधिक काळ कोकण रेल्वे मार्ग ठप्प झाल्याची घटना घडली नव्हती. निसर्गावर मात करत कोरेने त्यादृष्टीने उपाययोजना केल्या होत्या; परंतु मध्य रेल्वे मार्गावरील भूस्खलनाने कोकण रेल्वे ठप्प होण्याची घटना सहा वर्षांनी घडली आहे.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com