भूस्खलनाने मिरजोळेत १६ एकर शेती आली धोक्‍यात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

रत्नागिरी - मुसळधार पावसाच्या दणक्‍याने मिरजोळे-मधलीवाडी येथे पुन्हा मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे. पंधरा वर्षांपासून सुरू असलेले भूस्खलन थांबविण्याबाबत उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. भूस्खलनामुळे १६ एकरपेक्षा जास्त शेती धोक्‍यात आहे. काही शेतजमीन वाहून गेली आहे.

रत्नागिरी - मुसळधार पावसाच्या दणक्‍याने मिरजोळे-मधलीवाडी येथे पुन्हा मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे. पंधरा वर्षांपासून सुरू असलेले भूस्खलन थांबविण्याबाबत उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. भूस्खलनामुळे १६ एकरपेक्षा जास्त शेती धोक्‍यात आहे. काही शेतजमीन वाहून गेली आहे.

आता शिल्लक असलेली जमीन वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची तगमग सुरू आहे. संरक्षण भिंतीचा प्रस्ताव देखील लाल फितीत अडकल्याने शेतकरी चिंतातूर आहेत. मिरजोळे-मधलीवाडी हा परिसर शहरालगत आहे. या भागातील खालचापाट येथे पुन्हा एकदा पावसामुळे भूस्खलन झाले आहे. जमिनीला मोठ्या भेगा पडून माती वाहून जात आहे. शेत जमिनीला मधल्याच भागाला भेगा जात असल्याने येथील सुमारे १६ एकरांहून जास्त शेती संकटात आली आहे. पंधरा वर्षे सातत्याने भूस्खलन होत असल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. 

मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा जमीन सुमारे १०० फूट लांब व १५ ते २० फूट उंच खचू लागली आहे. जमीन खचत राहिल्यास ऐन खरिपाच्या हंगामात व लावणीच्या काळात हा धोका वाढणार आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास काही एकर शेतजमीन नष्ट होण्याची भीती आहे. 

पूर्ण शेती नष्ट होण्याची भीती 
२००६ मध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यावेळीही मोठे भूस्खलन झाले होते. या भूस्खलनात येथील ४५ एकर जमीन एकाच वेळी खचली होती. शेती, बागायतीदेखील उद्‌ध्वस्त झाली. या प्रकारामुळे त्या भागातील शेतकऱ्यांनी शेती करणेही सोडून दिले होते. दरवर्षी भूस्खलनात वाढ होत असल्याने शेतकऱ्याची पूर्ण शेती नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

१५ ते २० लाख खर्चाचा प्रस्ताव पडून
काही वर्षांपूर्वी महसूल अधिकाऱ्यांनी पाहणी करून येथील जमिनीला तडा जाण्याच्या या प्रकाराची भौगोलिक तज्ज्ञांकडून पाहणीही केली होती. भूस्खलनाचा हा प्रकार त्यावेळी नमूद करताना झालेल्या नुकसानीचा अहवाल तयार केला होता. त्यावर उपाय योजनाही सूचविण्यात आली होती. सातत्याने पाठपुरावा करून यावर उपाय म्हणून संरक्षक भिंत आणि बंधारा प्रस्तावित करण्यात आला होता. सुमारे १५ ते २० लाख रुपये त्याला खर्च अपेक्षित आहे. मात्र, अजून हा प्रस्ताव शासन दरबारी पडून आहे. त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. 

मिरजोळे येथील भूस्खलन झालेल्या भागाची आम्ही पाहणी केली. सुमारे १० मीटरपर्यंत भेगा गेल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना याची माहिती देऊन तत्काळ महत्त्वाची बैठक बोलावली आहे. भूगर्भशास्त्रज्ञांना पाचारण केले आहे. भूस्खलन थांबविण्यासाठी प्रस्तावित संरक्षक भिंतीला जिल्हा नियोजन समितीकडून निधी मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. धोकादायक भागात शेती करण्यास जाऊ नये, अशा सूचना शेतकऱ्यांना दिल्या आहेत. 
- शशिकांत जाधव,  
तहसीलदार, रत्नागिरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: landslide in Mirjole 16 acres of cultivated land affected