लांजा नगरपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रमाचा अंदाज चुकला अन्...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

लांजा नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवारांची धावपळ उडाली आहे.

रत्नागिरी - लांजा नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूक फेब्रुवारीत लागेल, असा अंदाज इच्छुक उमेदवारांना होता. मात्र, त्यापूर्वीच कार्यक्रम जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवारांची धावपळ उडाली आहे. पक्षाकडून तिकीट मिळविण्यापासून ते अर्ज भरणे आणि त्यानंतर प्रत्यक्ष प्रचार करण्यासाठी अत्यल्प कालावधी मिळणार असल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. 

पक्षांतर्गत नाराजी उफाळण्याची शक्‍यता  

निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांतील इच्छुकांची उमेदवारी मिळविण्यासाठी आपापल्या पक्षाकडे मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. उमेदवारीसाठी असणारी भाऊगर्दी लक्षात घेता उमेदवारी निवड ही सर्वच पक्षांची डोकेदुखी ठरणार आहे. उमेदवारीवरून जोरदार घमासान सुरू होणार असून पक्षांतर्गत नाराजी उफाळून येण्याची शक्‍यता आहे.

वाचा - निलेश राणे म्हणाले, दीपक केसरकर हाच मुद्दा आणणार पण आम्ही... 

बंडखोरी शमविण्याचे आव्हान

प्रत्येक प्रभागात इच्छुकांची संख्या मोठी असल्याने संभाव्य बंडखोरीचे वादळ शमविणे हे प्रत्येक राजकीय पक्षांसमोरील मोठे आव्हान ठरणार आहे. शहराच्या वाढत्या विस्ताराच्या तुलनेने बाजारपेठ विस्तारलेली नाही. शहराचे अनेक प्रश्न गेली कित्येक वर्षे तसेच आहेत. वाढत्या शहरीकरणाबरोबरच शहरात सांडपाण्याचा प्रश्न, पाणीप्रश्न, अंतर्गत रस्त्यांची दूरवस्था, साठणारा कचरा, बाजारपेठेचे पुनर्वसन, नगररचनेचा अभाव, नळपाणी पुरवठा योजनेवरील ताण आदी असंख्य समस्या, प्रश्न भेडसावत आहेत. या साऱ्या समस्यांची सोडवणूक करणे हे एक आव्हान आहे. 

हेही वाचा - कोकणातील या धरणाला लागलीय गळती... 
 

 प्रभाग रचना  बदलली 

लांजा नगरपंचायतीच्या नव्या प्रभाग रचनेनुसार पूर्वीच्या प्रभागांची रचना बदलली गेली आहे. नवीन प्रभाग रचना अस्तित्वात आल्याने अनेकांना या रचनेनुसार सामोरे जाताना अडचणीचे ठरले आहे. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lanza nagar panchayat election declerd and Interested candidates are more active