या महिलांनी घेतला पुढाकार अन् या बहुगुणी व बहुउपयोगी औषधाची केली लागवड....

सचिन माळी
सोमवार, 13 जुलै 2020


मंडणगड तालुका; ८ स्वयंसहाय्यता गट सरसावले; आर्थिक उन्नतीचे साधन

मंडणगड (रत्नागिरी) : उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष मंडणगडच्या माध्यमातून तालुक्यात स्वयंसहाय्यता समूहांनी सुमारे दोन एकरवर बहुगुणी व बहुउपयोगी औषधी अशी हळद लागवड केली आहे. वेळास-100 किलो, निगडी-100 किलो, आंबडवे-100 किलो, पणदेरी-150 किलो व शेनाळे, म्हाप्रळ याठिकाणी स्वयं सहाय्यता समूहांनी तसेच तुळशी व पालवणी येथील हळद उत्पादक गटांनी हळद लागवड केली आहे. कोकणातील अन्य शेतकऱ्यांनी अशाच पद्धतीने शेती प्रमाणे व्यावसायिक दृष्टीने हळद लागवड केल्यास आर्थिक उन्नतीचे साधन निर्माण होणार आहे.

मंडणगड तालुक्यातुन रोजगारनिमित्त झालेलं मोठ्या प्रमाणावर स्थलांतर. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला आर्थिक बाबतीत परावलंबी. अशा परिस्थितीत उमेदने तालुक्यातील स्त्रियांना स्वयंरोजगाराची वाट दाखवली आहे. त्यांच्यातील कौशल्याला नवे पंख दिले जात आहेत. ६५० बचत गट, ४१ ग्रामसंघ, २ प्रभाग संघ यातून तालुक्यातील सुमारे ७ हजार महिला जोडल्या गेल्या. त्यामुळे खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण करताना त्याला बळकट करण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा- घरकाम करीत असलेल्या महिलेच्या घरातील चारजण कोरोना पॉझीटिव्ह ;  मात्र संपर्कातील अधिकाऱ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह -

उमेद समूहातून दोन एकरावर हळद लागवड​

गरीब आणि जोखीमप्रवण कुटुंबांना समृद्ध, आत्मसन्मानाचे आणि सुरक्षित जीवन जगता यावे यासाठी ‘उमेद’ अंतर्गत एकात्मिक प्रयत्न सुरू आहेत. पंचायत समिती मंडणगडचे गटविकास अधिकारी एम. दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदचे विस्तार अधिकारी मोहन पोवार, तालुका व्यवस्थापक रुपेश मर्चंडे, प्रभाग समन्वयीका समिधा सापटे यांनी कृतिशील पावले उचलून स्वयंसाहाय्यता गटाद्वारे, बचतगटाद्वारे स्त्रियांचे संघटन करून त्यांच्यातील उद्योग व्यवसायाला चालना देत आहेत.कोकणात शेतीबरोबर हळद लागवड हा शेतकरी व बचत गटांना उत्तम आणि आश्वासक पर्याय ठरू शकतो.

हेही वाचा- दिला इशारा मात्र जहाज समुद्रात : त्या जहाजाचा खर्च कोटीच्या घरात.... -

हळदीला प्रचंड मागणी असून पावसाच्या पाण्यावर हे पीक उत्तमरीत्या येते. यावर रोगाचा प्रादुर्भाव होत नसल्याने व कमी जागेत चांगले उपन्न येत असल्याने व्यावसायिक दृष्टया हळद लागवडीचा विस्तार झाल्यास त्याचा फायदा येथील शेतकरी व महिलांना होवू शकतो या विचाराने उमेदने यावर भर दिला आहे. ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसंघ तर जिल्हा परिषद प्रभाग स्तरावर प्रभागसंघ तयार करण्यात आले आहेेेत. या संस्थांच्या माध्यमातून गटशेती, परसबाग लागवड, कुक्कुटपालन, दिवाळी महोत्सव असे उपक्रम राबविण्यात आले आहेत. तसेच अधिकार, हक्क, वित्तीय सेवा तसेच शाश्वत उपजीविकेच्या संधी प्राप्त होण्यासाठी वातावरण निर्मिती केली जात आहे.

हेही वाचा- रवींद्र नागरेकर : प्रशासन काम चुकीचं करते, मग मंत्री कशाला...? -

हळद उत्पादक गटाद्वारेच खरेदी आणि प्रक्रिया
 स्वयंसहाय्यता गटांनी उत्पादित केलेली हळद ही तुळशी व पालवणी हे हळद उत्पादक गट खरेदी करून त्यावर प्रक्रिया करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे उत्पादन घेतल्यानंतर माल विक्री करण्यासाठी येणारी अडचण दूर होणार आहे. तसेच त्यावर स्थानिक स्तरावर प्रक्रिया करण्याचा प्रयत्न उमेदच्या माध्यमातून सुरू आहे. त्यामुळे भविष्यात हळद लागवडीचे क्षेत्र वाढणार आहे.
संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Large scale migration from Mandangad taluka for employment