
प्रास्ताविकात धीरज वाटेकर यांनी कोमसाप आणि मसाप या साहित्यसंस्थांच्या शाखा सातत्याने चिपळुणात एकत्रित करीत असलेल्या कार्यक्रमांचा आढावा घेतला.
चिपळूण ( रत्नागिरी ) - लक्ष्मी कथासंग्रहातील नायिकांच्या वेदना या संवेदना रूपाने सोबतीने जगण्याची कला लेखिका नीला नातू यांनी चांगली अवगत केलेली आहे. लेखिकेला अभिनयाचीही उत्तम जाण आहे. त्यांच्या अंतर्मनात बरंच काही भरलेलं आहे, याची जाणीव या साऱ्या कथा करून देतात. विशेष म्हणजे या कथा कोणत्याही एका बाजूला न झुकता त्रयस्थपणे लिहिल्या गेल्या आहेत. त्यामुळे त्या नीतिकथा, बोधकथा किंवा स्त्रीवादी अजिबात झालेल्या नाहीत, असे प्रतिपादन कवी, समीक्षक अरुण इंगवले यांनी केले.
नीला नातू यांच्या "लक्ष्मी' कथासंग्रहाचे प्रकाशन काल (ता. 24) चिपळुणातील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरात झाले. त्या वेळी सखोल जाणिवेतून कागदावर उतरलेल्या "लक्ष्मी' कथासंग्रहातील प्रत्येक कथांचा फॉर्म वेगळा आहे. कथांतून स्त्रीजीवनाच्या विविध प्रश्नांवर उत्तरं सांगितली गेली आहेत. तरीही आजची स्त्री चूल, मुलं आणि करियर या त्रांगडात अडकली आहे, अशी खंत इंगवले यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविकात धीरज वाटेकर यांनी कोमसाप आणि मसाप या साहित्यसंस्थांच्या शाखा सातत्याने चिपळुणात एकत्रित करीत असलेल्या कार्यक्रमांचा आढावा घेतला. नातू घराण्यातील माणसं वाचण्याचा वारसा नीला नातू यांनी साहित्यरूपाने या कथासंग्रहाद्वारे वाचकांच्या समोर आणल्याचेही त्यांनी नमूद केले. डॉ. रेखा देशपांडे यांनी पूर्वी एका कार्यक्रमात अभिनेत्री लालन सारंग यांनी नीला यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी असल्याचे नमूद केल्याची आठवण सांगितली. नीला नातू यांचा देशपांडे यांच्या हस्ते तसेच दिलीपराज प्रकाशनच्यावतीनेही त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
राजीव बर्वे म्हणाले, पुण्यापेक्षा अधिक गर्दी इथे पाहिली. नामवंत लेखक रविप्रकाश कुलकर्णी यांनी या कथासंग्रहाबाबत प्रकाशनपूर्व अभिप्राय खूप चांगला दिला होता. अरुण इंगवले यांनी पुस्तकातील मर्मस्थळे अधोरेखित केली.
सुपांमधून जणू वाण
ग्रामीण भागातील स्त्री जीवनात सुपाचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. प्रकाशनसमयी फुलांच्या पाकळ्यांनी सजवलेल्या सुपांमधून जणू "वाण' देत असल्याच्या कल्पकतेने नऊवारी परिधान केलेल्या स्त्रियांच्या हस्ते व्यासपीठावर कथासंग्रह आणून प्रकाशन करण्यात आले.