
पाळीव कुत्र्याला वाचविण्यासाठी गेलेल्या पवार दाम्पत्यांवर बिबट्याने घरात घुसून हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (ता. २०) रात्री बारा वाजता कुर्ली येथे घडला.
वैभववाडी : पाळीव कुत्र्याला वाचविण्यासाठी गेलेल्या पवार दाम्पत्यांवर बिबट्याने घरात घुसून हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (ता. २०) रात्री बारा वाजता कुर्ली येथे घडला. यामध्ये मोहन पवार (वय ६०) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना जिल्हा रूग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले आहे. तर त्यांची पत्नी ही जखमी आहे. या बिबट्याच्या दहशतीमुळे परिसरात भितीचे वातावरण आहे.
दरम्यान, कुर्ली येथे मोहन पवार हे कुटुंबीय काल रात्री जेवण आटोपून झोपण्यासाठी गेले. रात्री बाराच्या सुमारास त्यांचा पाळीव कुत्रा भुंकू लागला. त्यामुळे पवार यांनी कुत्रा का भुंकतो म्हणून पाहीले असता घराच्या पडवीत असलेल्या कुत्र्याला बिबट्याने पकडले होते. पवार कुत्र्याला सोडविण्यासाठी आरडाओरडा केला असता, बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. पत्नीला सोडविण्यासाठी पवार गेले असता बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये त्यांच्या पाठीला गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांना तत्काळ जिल्हा रूग्णालयात उपचाराकरीता हलविण्यात आले.
दरम्यान, घरात घुसून बिबट्याने हल्ला केल्यामुळे बिबट्याच्या या दहशतीमुळे कुर्ली गावातील लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहेत. तालुक्यात बिबट्यांचे प्रमाण अधिक असून, बिबट्यांचे वस्तीत येण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.