वनअधिकार्‍यांचे धाडस ; फिल्मी स्टाईलने बिबट्यावर घातली झडप आणि केले जेरबंद....

राजेश शेळके
शुक्रवार, 29 मे 2020

ग्रामस्थांनीच टाकली बिबट्यावर झडप
महिला वनअधिकार्‍यांचे धाडस ; झाडावर चढल्याने पकडणे झाले अवघड
.

रत्नागिरी : निवळी शेल्टेवाडीतील बिबट्याचा थरार अंगावर शहारे आणणारा होता. बिथरलेल्या बिबट्याला काबूत करणे अवघड होते. झाडावरून उतरल्यानंतर तो गडग्याच्या बाजूला लपला. मात्र वन अधिकारी प्रियांका लगड यांनी धाडस दाखवत स्थानिकांना मदतीला घेऊन त्याच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला.

मात्र सावध बिबट्याने हालचाल पाहून लगड यांच्यावर हल्ला चढवला. मात्र वन विभागाचे कर्मचारी आणि स्थानिकांच्या धाडसाला दाद दिली पाहिजे. हल्ला केल्यानंतर आठ ते दहा जणांनी चक्क बिबट्यावरच झडप मारली. बिबट्याची मान, पाय दाबून धरल्यामुळे बिबट्या हतबल झाला. लगेच त्याचे तोंड, पाय बांधून त्याला पिंजर्‍यात कैद केले.

हेही वाचा- 51 शिक्षकांना नोडल अधिकाऱ्यांचा दणका : कामाच्या ठिकाणी हजर न राहणे पडले महागात

ग्रामस्थांचे प्रसंगावधानाचे कौतुक हात, पाय बांधून ठेवले पिंजर्‍यात...

जिल्ह्यात आतापर्यंत विहिरीत पडलेल्या किंवा फासकीत अडकलेल्या बिबट्याला पकडले आहे. माणसांच्या एकजुटीने ताकदीने बिबट्या पकडण्याची ही पहिलीच वेळ आहे.
दबक्या पावलांनी सर्व बिबट्याच्या दिशेने जात होते. मात्र बिबिट्याला चाहूल लागली आणि त्याने थेट वन अधिकारी प्रियांका लगड यांच्यावर हल्ला केला. मात्र त्याचवेळ प्रसंगावधान राखून दबा धरून बसलेले राजेंद्र पाटील यांनी थेट बिबट्यावर झडप टाकली आणि त्याची मान दाबून धरली. बिबट्याची मान सोडविण्यासाठी धडपड सुरू असताना अन्य सहकार्‍यांनी त्याचे चारी पाय धरले. त्यामुळे बिबट्या हतबल झाला. स्थानिकांनी तत्काळ दोरीने त्याचे तोंड, पाय बांधले. बिबट्यावर पूर्ण ताबा मिळविल्यांतर त्याला पिंजर्‍यात बंद केले.

हेही वाचा- विद्यार्थ्यांसाठी सरकार आणणार नवी योजना? आगामी शैक्षणिक वर्षात हे होऊ शकतात मोठे बदल 

गर्दी पाहून बिबट्या बिथरला

महिलेवर पहिला हल्ला केल्यानंतर बिबट्या जमावाला घाबरून झाडावर चढला. तासभर तो तिथेच होता. या दरम्यान ही बातमी सर्वत्र पसरल्याने घटनास्थळी मोठी गर्दी झाली. गर्दी पाहून बिबट्या बिथरला. झाडावरून उडी मारून गडग्याच्या बाजूला लपला. त्यानंतर वन अधिकारी लगड यांनी त्याच्याजवळ जाण्याचा धाडसी निर्णय घेतला. यामध्ये वनपाल राजेंद्र पाटील यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य परशुराम कदम, विटूमामा नितोरे, किसन नितोरे, संतोष नितोरे, अमित गावडे, सागर कदम, मयूर कदम यांना बरोबर घेतले.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leopard attacks in village people in ratnagiri