विद्यार्थ्यांसाठी सरकार आणणार नवी योजना? आगामी शैक्षणिक वर्षात 'हे' होऊ शकतात मोठे बदल

युवराज पाटील
शुक्रवार, 29 मे 2020

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ऑनलाईन शाळा सुरू होणार अशी चर्चा होती.

शिरोली पुलाची (कोल्हापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्ग न भरवता शाळा सुरू करण्याच्या दिशेने राज्य सरकारने काम सुरू केले आहे. आगामी शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना टिव्ही आणि रेडिओवरून शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारने दूरदर्शनचे 12 तास, तर रेडिओचा दोन तासाचा वेळ देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. मात्र त्याचबरोबर शिक्षण विभागाने स्वतंत्र शैक्षणिक वाहिनी (चॅनेल) सुरू करावी, अशी मागणी शैक्षणिक क्षेत्रातून होत आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ऑनलाईन शाळा सुरू होणार अशी चर्चा होती. ऑनलाईन वर्ग घेण्यासाठी स्मार्टफोन किंवा विशिष्ट प्रणालीबरोबर, चांगली इंटरनेट सुविधाही लागते. त्यासाठी खर्च आहे. परिणामी गरीब विद्यार्थ्याच्या शिक्षणात खंड पडू शकतो. त्यामुळे कोणताही खंड न पडता सर्वांचे शिक्षण सुरू राहावे, यासाठी सरकारने दुरदर्शन व रेडिओवरून शाळा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगामी शैक्षणिक वर्षात दूरदर्शनच्या दोन वाहिन्यांवरून दररोज बारा तास, तर ऑल इंडिया रेडिओवरून दोन तास शैक्षणिक अभ्यासक्रमाचे प्रसारण करण्याची राज्य सरकारची तयारी आहे.

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाईन शाळा सुरू करण्यासाठी राज्याने दूरदर्शनवर अवलंबून राहण्याऐवजी स्वतंत्र शैक्षणिक वाहिनी (चॅनेल) सुरू करण्याची मागणी शिक्षण क्षेत्रात जोर धरू लागली आहे. दोन वर्षापूर्वी इयत्ता पहिली व आठवीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाचे ऑनलाईन प्रशिक्षण झाले. तेव्हा राज्याने गुजरात सरकारच्या वंदे गुजरात चॅनेलची मदत घेतली गेली होती. गुजरात सरकारने २०१५ मध्ये २४ तास चालणारे १६ चॅनेल सुरू केले असून या माध्यमातून अनेक शैक्षणिक उपक्रम विद्यार्थी व शिक्षकांना दाखविले जातात. त्याच धर्तीवर राज्य सरकारने स्वतंत्र शैक्षणिक वाहिनी सुरू केल्यास राज्यातील विद्यार्थ्यांना विविध स्कॉलरशिप, स्पर्धा परीक्षा, मेडिकल व इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षा, पुनर्रचित अभ्यासक्रमाचे मार्गदर्शन व शैक्षणिक कार्यक्रम या माध्यमातून विद्यार्थ्यांना पाहायला मिळू शकतात. तर शिक्षक व मुख्याध्यापकांना पुनर्रचित अभ्यासक्रम, शिक्षणात होणारे बदल याबाबत उद्बोधन होऊ शकते. त्याचा फायदा राज्यातील गुणवत्तवाढीसाठी होऊ शकतो. 

हे पण वाचा - धक्कादायक ; आरोग्य सेविकेचा पतीकडून गळा आवळून खून
 

महाराष्ट्रात १ लाखाहून अधिक प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहेत. येथे सुमारे साडेसात लाख शिक्षक अध्यापनाचे काम करीत आहेत. तर या शाळांमध्ये २ कोटीहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहे. स्वतंत्र शैक्षणिक वाहिनीची (चॅनेल) निर्मिती केल्यास तंत्रस्नेही शिक्षकांना व विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे.

हे पण वाचा - अक्षय, तू घाबरू नकोस! तुझ्यासारख्या प्रामाणिक शिवभक्तांच्या पाठीशी ठामपणे उभा ; संभाजी राजे
 

राज्यातील शाळां, शिक्षक व विद्यार्थ्यांची संख्या पाहता शिक्षण विभागाने स्वतंत्र शैक्षणिक वाहिनी सुरू करणे गरजेचे आहे.

-दिपक शेटे, तंत्रस्नेही शिक्षक.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coming academic year students will be given educational lessons on TV and radio