पाचल-दिवाळवाडीत विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मे 2019

राजापूर - गेल्या काही दिवसांपासून पाचल परिसरामध्ये बिबट्याचा मुक्तपणे संचार असल्याचे ग्रामस्थ सांगत होते. आज त्याचा पडताळा झाला. रात्रीच्या वेळी भक्ष्याचा पाठलाग करताना अंदाज न आल्याने बिबट्या विहिरीमध्ये पडला. वन विभागाने त्याला स्थानिक ग्रामस्थांच्या साथीने सुखरूपपणे बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडले.

सोमवारी रात्री तालुक्‍यातील पाचल-दिवाळवाडी येथे ही घटना घडली. विहिरीमध्ये पडलेला बिबट्या पाच वर्षांचा असून पाचल-दिवाळवाडी येथील बलवंत सुतार यांच्या घराजवळ विहीर आहे. विहिरीमधून कोणाचा तरी आवाज ऐकू आल्याने सुतार यांनी आज सकाळी विहिरीमध्ये डोकावून पाहिले. त्यावेळी त्यांना विहिरीमध्ये बिबट्या पडलेला दिसला. तो विहिरीच्या काठाला असल्याचे निदर्शनास आले.

विहिरीमध्ये बिबट्या असल्याचे पाहून भीती वाटली. त्यांनी ही माहिती घरातील लोकांना दिली. विहिरीच्या काठावर बघ्यांची गर्दी झाली होती. दरम्यान, बिबट्या विहिरीमध्ये पडल्याची माहिती वन विभागाला देण्यात आली. विभागीय वनअधिकारी सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूरच्या वनपाल राजश्री कीर, वनरक्षक संजय रणधीर, रत्नागिरीचे वनपाल गुरव, लांजाच्या प्रियंका लगड यांच्यासह वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. 

त्यानंतर वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या साथीने पिंजऱ्याच्या साह्याने बिबट्याला सुखरूपपणे बाहेर काढले. त्यानंतर बिबट्याची तपासणी केली असता त्याला कोणतीही जखम वा इजा झालेली आढळली नाही. त्यानंतर बिबट्याला वन विभागाद्वारे नैसर्गिक अधिवासामध्ये सोडून देण्यात आले.  
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard found in Pachal Divalwadi in Rajapur Taluka