राजापुरातील धोपेश्‍वरमध्ये बिबट्याचा संचार 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 September 2020

शहरानजीकच्या धोपेश्‍वर येथील गुरववाडी, नाडणकरवाडी लोकवस्तीपासून काही अंतरावर जंगल परिसर भाग आहे. या वाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असून या वाड्यांसह लगतच्या गांगो मंदिर जंगल परिसरामध्ये बिबट्याचा गेल्या काही दिवसांपासून मुक्‍तपणे वावर सुरू आहे

राजापूर ( रत्नागिरी ) - शहरानजीकच्या धोपेश्‍वर येथील गुरववाडी, नाडणकरवाडी परिसरामध्ये बिबट्याच्या दिवसाढवळ्या वावरासह दर्शनाने शेतकऱ्यांसह लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

एवढेच नव्हे तर दिवसाढवळ्या बिबट्याच्या घुमणाऱ्या जोरदार डरकाळ्यांनी जंगल परिसरामध्ये गुरे चरायला जाण्यास धजावत आहेत. त्यातून, शेतकऱ्यांनी बिबट्याच्या दहशतीने गुरांना जंगल परिसरामध्ये चरावयास नेण्याचेच गेल्या काही दिवसांपासून बंद केले आहे. 

शहरानजीकच्या धोपेश्‍वर येथील गुरववाडी, नाडणकरवाडी लोकवस्तीपासून काही अंतरावर जंगल परिसर भाग आहे. या वाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असून या वाड्यांसह लगतच्या गांगो मंदिर जंगल परिसरामध्ये बिबट्याचा गेल्या काही दिवसांपासून मुक्‍तपणे वावर सुरू आहे. जंगल परिसरामध्ये दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याचा दिवसाढवळ्या लोकवस्तीमध्येही वावर सुरू आहे.

लोकवस्तीपासून काही अंतरावर वाडीतील अरविंद सूद यांचे शेतघर आहे. त्या ठिकाणी असलेली त्यांची पाळीव जनावरे यापूर्वी बिबट्याने फस्त केल्याची घटनाही घडली आहे; मात्र मधल्या काळात या परिसरातील बिबट्याचा वावर आणि उपद्रवही थांबला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला होता. मात्र, गेल्या आठ-दहा दिवसांपासून पुन्हा एकदा बिबट्याचा पूर्वीप्रमाणे उपद्रव सुरू झाला आहे. 

जंगल परिसरासह सूद यांच्या घरालगत बिबट्याचा दिवसाढवळ्या संचार सुरू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी सूद यांच्या शेतघराकडे जाणाऱ्या पायवाटेवर बिबट्याचे काही लोकांना दर्शनही झाले होते. त्यामुळे सूद यांच्या घरातील लोकांना घरातून बाहेर पडणे धोक्‍याचे बनले आहे. बिबट्याच्या या दहशतीमुळे भयभीत झालेल्या या वाड्यांमधील लोकांनी बिबट्याचा वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard Seen In Dhopeshwar Rajapur Taluka Ratnagiri Marathi News

Tags
टॉपिकस
Topic Tags: