गतवर्षीच्या तुलनेत सिंधुदुर्गात पाऊस कमी 

भूषण आरोसकर
शुक्रवार, 21 जून 2019

आधीच 8 ते 10 दिवस लांबणीवर पडलेल्या खरीप हंगामात आणखी 5 ते 7 दिवसांची वाढ होणार हे नक्की. पाठ फिरविलेल्या मॉन्सूनच्या सरासरीत घट झाली असून गतवर्षापेक्षा 638 मिलिमीटरने कमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी 952 मि.मी. एवढा पाऊस झाला होता. 

सावंतवाडी - अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वायू चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मोसमी पावसाचे आगमन लांबले होते. परिणामी शेतकऱ्यांचा पेरणी हंगाम रखडला. चक्रीवादळाचा प्रभाव कालपासून कमी होण्यास सुरवात झाल्याने जिल्ह्यात मॉन्सून सक्रिय होणार असल्याचे वृत्त आहे.

आधीच 8 ते 10 दिवस लांबणीवर पडलेल्या खरीप हंगामात आणखी 5 ते 7 दिवसांची वाढ होणार हे नक्की. पाठ फिरविलेल्या मॉन्सूनच्या सरासरीत घट झाली असून गतवर्षापेक्षा 638 मिलिमीटरने कमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी 952 मि.मी. एवढा पाऊस झाला होता. 

दोन दिवसांत जिल्ह्यात चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. गतवर्षी 1 हजार मिलिमीटरच्या सरासरीने पाऊस झाला होता; मात्र यंदा 18 जूनपर्यंत 190 मिलिमीटर पाऊस झाला.

या दोन दिवसांत तो 252 पर्यंत पोचला. जिल्ह्यात रोहिणी नक्षत्राच्या आगमनातच पाऊस होतो; मात्र यावर्षी जूनचे दोन आठवडे संपले तरी जिल्ह्यात पावसाची चिन्हे दिसत नव्हती. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 12 ते 14 जूनला पाऊस पूर्णपणे सक्रिय होणार असल्याचे सांगण्यात आले होते; मात्र पावसाने दडी मारल्याने पेरण्यांची कामेही वेळेत पूर्ण झालेली नाहीत. लावणी हंगाम तर त्यापुढेही गेला. अगोदरच तब्बल आठ ते दहा दिवस लांबलेल्या पावसाने यात आणखी एक आठवड्याची भर टाकल्यामुळे भविष्यात पीक उत्पादनावर चिंतेचे ढग निर्माण झाले आहेत. 

जिल्ह्याची स्थिती पाहता रात्री व दिवसा अधूनमधून पावसाचा शिडकाव होताना दिसून येत आहे. कोल्हापूर घाटमाथ्याजवळचा प्रदेश सोडला तर जिल्ह्याच्या अन्य तालुक्‍यांत फारसा पाऊसच झाला नाही. वैभववाडी, कणकवली याच भागात जोराचा पाऊस झाला. कुडाळ, मालवण येथे मध्यम तर सावंतवाडी, वेंगुर्ले, देवगड व दोडामार्ग येथे मध्यम हलक्‍या स्वरूपाचा पाऊस झाला. जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी हलक्‍या व मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. कोकण किनारपट्टीवरील असलेल्या समुद्री भागात चक्रीवादळाचा दबाव निर्माण झाल्यामुळे मॉन्सूनसाठी आवश्‍यक वातावरणच निर्माण झाले नाही.

मॉन्सून वारे जिल्ह्याच्या वातावरणापासून दूरच राहिल्याने थेट परिणाम जिल्ह्याच्या मॉन्सून रेषेवर होताना दिसून आला. 8 ते 10 जूनच्या दरम्यान पूर्वमोसमी वाऱ्याची धडक थोडीशी जाणवली होती; मात्र त्याचा अपेक्षित जोर जिल्ह्यात कुठेच दिसून आला नाही. गेल्या चार दिवसांत कणकवलीचा काही भाग व वैभववाडीच्या बऱ्याचशा भागात मॉन्सून बरसला. पेरणी हंगामाची कामे रखडल्यामुळे पुढे होणारी लावणीची कामे आता जूनऐवजी जुलै महिन्यात होणार आहेत हे स्पष्ट आहे. 

गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत आतापर्यंत मॉन्सूनची सर्वात कमी सरासरी पावसाची नोंद झाली आहे. जून महिना संपत आला तरी मॉन्सूनचा तीनशे मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला नाही. यंदा मॉन्सून पूर्ण क्षमतेने जिल्ह्यात बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे लांबलेला मॉन्सून भविष्यात अचानक बरसला तर बळीराजासमोर नैसर्गिक संकट बनून उभा राहील, अशी भीतीही व्यक्त होत आहे. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या भात पिकाला चांगलाच फटका बसणार आहे. गेल्या चार दिवसांचे चित्र पाहता जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. लांबलेला मोसमी पाऊस आणि मॉन्सूनचे कोलमडलेले वेळापत्रक बळीराजाची चिंता वाढविणार आहे. 

गेल्या पाच वर्षांचा विचार केला असता या जून महिन्यातील पर्जन्यमान 50 टक्‍क्‍यांपेक्षा घटले असल्याचे दिसून आले. वादळामुळे मॉन्सूनच्या आगमनास अनुकूल परिस्थिती निर्माण होण्यास अडथळा निर्माण झाला. आता वादळ शमले आहे. येत्या चार दिवसांत मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. 
- डॉ. यशवंत मुठाळ,
शास्त्रज्ञ (तांत्रिक अधिकारी) ग्रामीण कृषी मौसम सेवा प्रकल्प, उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे 

जूनमधील पर्जन्यमान (20 जूनपर्यंत) 
*वर्ष*                  पाऊस (मि.मी) 
*2015*                    484.4 
*2016*                    377.8 
*2017*                    552.5 
*2018*                    890.1 
*2019*                   252.0 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Less rain in Sindhudurg on an last years average