शाळा सुरू होण्यात हमीपत्राचा खो; विद्यार्थ्यांची हमी कोण घेणार?

मकरंद पटवर्धन
Friday, 20 November 2020

शाळांमध्ये आठवी, नववी, दहावी आणि अकरावी बारावी हे वर्ग सुरू होणार आहेत.

रत्नागिरी : शासनाच्या आदेशानुसार शाळा सुरू होणार आहेत; मात्र मुलांची जबाबदारी कोणतीही शाळा घेण्यास तयार नसून पालकांकडून हमीपत्र मागवण्यात येत आहेत. परंतु, शासन अथवा शाळेने विद्यार्थ्यांची हमी घ्यावी. दुर्दैवाने कोरोनाची लागण झाल्यास या विद्यार्थ्यांवर, कुटुंबीयांवर कोरोना संबंधातील मोफत उपचार झाले पाहिजेत, अशी मागणी रत्नागिरी येथील पालकांनी केली आहे.

वर्गामध्ये 50 टक्के विद्यार्थी उपस्थित राहावे तसे नियोजन शाळांनी केले आहे; मात्र मुलांना शाळेत कोणत्या वाहतूक व्यवस्थेद्वारे सोडावे, असा प्रश्न पालकांना पडला आहे. कारण शासनाने मुलांनी सायकलद्वारे शाळेत यावे किंवा पालकांनी दुचाकीद्वारे त्यांना शाळेत सोडावे, असे निर्देश दिले आहेत. परंतु प्रत्यक्षात ही गोष्ट अशक्‍य आहे. शहरातील विद्यार्थ्यांना शाळेत सोडणे व घरी नेणे सोपे राहील. परंतु ग्रामीण भागातून शहरांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना एसटीतून प्रवास करताना कोरोनाची लागण झाल्यास जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न पालकांना पडला आहे.

शाळांमध्ये आठवी, नववी, दहावी आणि अकरावी बारावी हे वर्ग सुरू होणार आहेत. साधारणपणे प्रत्येक वर्गामध्ये 50 विद्यार्थी असतात. म्हणजे एका तुकडीत एका वेळेला 25 विद्यार्थी उपस्थित राहतील आणि प्रत्येक वर्गाच्या अशा किमान 3 ते 4 तुकड्या मोठ्या शाळांमध्ये असतात. म्हणजे शेकडो विद्यार्थी एकाच वेळेला शाळेत उपस्थित राहणार आहेत. एखाद्या विद्यार्थ्यास संसर्ग झालेला असल्यास त्याच्या माध्यमातून अन्य विद्यार्थ्यांनाही व त्यांच्या कुटुंबीयांना तसेच संपर्कात येणाऱ्या किमान पाच ते दहा व्यक्तींना कोरोनाची लागण होऊ शकते. त्यामुळे पालक मुलांना शाळेत सोडण्याच्या संभ्रमात आहे.

हे पण वाचा दापोलीतील उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरणार; राजेश टोपे  

सर्वाधिक काळजी अत्यावश्‍यक

काही राज्यांमध्ये शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थी व शिक्षकांना कोरोना होण्याच्या घटना घडल्या आहेत. कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती आहे. तसेच कोरोना रुग्णसंख्येत महाराष्ट्राचा नंबर देशात अव्वल असल्यामुळे येथे सर्वाधिक काळजी घेणे अत्यावश्‍यक आहे, असे पालकांचे मत आहे.

 

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Letter of guarantee problem in school starting