Good News : लवकरच ग्रंथालये होणार सुरू

सकाळ वृत्तसेवा
Monday, 12 October 2020

त्यानुसार येत्या काही दिवसांत ग्रंथालये सुरू करण्यात येतील, असे सामंत यांनी सांगितले.

चिपळूण (रत्नागिरीत)  : ‘‘सहा महिन्यांपासून बंद असलेली राज्यातील सार्वजनिक ग्रंथालये लवकरच सुरू करण्यात येतील,’’ अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ‘सकाळ’ला दिली. सार्वजनिक ग्रंथालये बंद असल्यामुळे ग्रंथालयचालकांचे आणि वाचकप्रेमींचे हाल होत असल्याचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेऊन सामंत यांनी ही माहिती दिली. 

हेही वाचा - इंजिनिअरिंगला प्रवेश घेणे झाले सोपे ; दीड लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना होणार फायदा 

राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू झाल्यामुळे मार्चपासून टाळेबंदी लागू करण्यात आली. त्यानंतर दोन महिन्यांनी टप्प्याटप्प्याने दुकाने, मॉल, हॉटेल्स सुरू करण्यात आली आहेत; मात्र ग्रंथालये सुरू करण्याबाबत शासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. सार्वजनिक ग्रंथालयांकडूनही ती सुरू करण्याबाबतची मागणी सातत्याने होत आहे. ग्रंथालये सुरू नसल्यामुळे वर्गणी गोळा होत नाही. नवीन पुस्तकांची खरेदी करता येत नाही. ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांचे वेतनही देता येत नाही.

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांच्या मुलांच्या हट्टापायी आरे कारशेडची जागा बदलली

ग्रंथालयचालकांची ही अडचण प्रसिद्ध करण्यात आली. त्याची दखल उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी घेतली. ते म्हणाले की, राज्यातील ग्रंथालये सुरू करण्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजीव जलोटा यांच्याशी चर्चा झाली. राज्यातील ग्रंथालये शिक्षण विभागाशी निगडित असल्यामुळे ती सुरू करण्याबाबत थोडा विलंब झाला आहे. ग्रंथालये सुरू करण्यासाठी कार्यपद्धती निश्‍चित होत आहे. त्यानुसार येत्या काही दिवसांत ग्रंथालये सुरू करण्यात येतील, असे सामंत यांनी सांगितले.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: library start within a days in konkan uday samant said this good news to speak with sakal in ratnagiri