भेदरलेल्या अवस्थेत रस्त्यावर सापडलेल्या दोन वर्षाच्या खवल्या मांजराला मिळाले जीवदान

राजेश शेळके
Sunday, 18 October 2020

काल रात्री 10 वाजता तळवडे कणगवली रस्त्यावर सापडले खवले मांजर

रत्नागिरी : लांजा तालुक्यातील तळवडे गावातील पोलिस पाटील आणि काही प्राणी मित्रांनी प्रसंगावधान दाखवत भेदरलेल्या अवस्थेत रस्त्यावर सापडलेल्या खवल्या मांजराला जीवदान दिले. दोन वर्षाच्या या खवले मांजराला लांजा वनपाल यांच्याकडे स्वाधीन करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

काल रात्री 10 वाजता तळवडे कणगवली रस्त्यावर खवले मांजर भेदरलेल्या अवस्थेत तळवडे येथील वैभव कनावजे, सौरभ कनावजे, प्रणय चव्हाण हे तळवडे फाटा वरून दुकान बंद करून घरी जात असताना त्यांच्या निदर्शनास पडले. दुर्मिळ प्राणी असल्याने त्यांनी पोलिस पाटील प्रदीप उर्फ बाबू पाटोळे यांना सांगून खवले मांजराचा अपघात, वा याला कोणतेही इजा होऊ नये म्हणून ताब्यात दिले. पोलिस पाटील प्रदीप पाटोळे आणि सरपंच संजय पाटोळे यांनी वनपाल सागर पताडे यांना या खवले मांजरची माहिती दिली.

हेही वाचा- दापोलीतील दुर्गम भागातील 27 शेतकर्‍यांनी बनवला ’कोकण सदाबहार’ ब्रॅन्ड -

विभागीय वनाधिकारी दीपक खाडे आणि परिक्षेत्र वनाधिकारी प्रियांका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा वनपाल श्री. पताडे आणि वनमजूर श्री. खेडेकर हे तातडीने तळवडे गावी दाखल झाले. खवले मांजर ताब्यात घेऊन नैसर्गिक अधिवासात सोडले. वनपाल सागर पाताडे यांनी तळवडे पोलिस पाटील आणि प्राणी मित्राचे कौतुक केले. जिल्हात दुर्मिळ खवले मांजर यांचे अस्तित्व धोक्यात आले असताना तळवडे गावातील घटना दिलासा दायक आहे. लांजा वनपाल आणि वन अधिकारी यांनी खवले मांजर वाचवा या बाबत केलेली जनजागृतीमुळे तळवडे गाव सतर्क असल्याचे सरपंच संजय पाटोळे यांनी सांगितले आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Life of a scaly cat at Talawade The two year old scaly cat was handed over to the Lanza forester