...तर कार्यालयाच्या काचा फुटतील! मनसेचे कार्यकर्ते झाले आक्रमक

दीपेश परब
Wednesday, 16 September 2020

तालुक्‍यातील जनता तुमच्या वाढीव बिला संदर्भात आमच्याकडे तक्रार घेऊन येत आहेत. वीजबील माफी झालीच पाहिजे

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - कोरोनामुळे लॉकडाउन काळात जी भरमसाठ विजबील आकारणी केली. या संदर्भात जाब विचारण्यासाठी आज येथील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तालुक्‍यातील महावितरणच्या कार्यालयात जाऊन मुख्य अधिकारी खटावकर यांच्याशी चर्चा केली. 

मनसेच्यावतीने वाढीव बिलासंदर्भात खटावकर यांना निवेदन दिले. यावेळी तालुका संपर्क अध्यक्ष सागर तुळसकर, तालुकाध्यक्ष सनी बागकर, मनविसे अध्यक्ष परशुराम परब, तालुकाध्यक्ष महादेव तांडेल, उपतालुकाध्यक्ष आबा चिपकर, विभाग अध्यक्ष विनायक फटनाईक, शहराध्यक्ष अमोद नरसुले, शाखाध्यक्ष दीपक फटनाईक, दीपक परब आदी उपस्थित होते. 

तालुक्‍यातील जनता तुमच्या वाढीव बिला संदर्भात आमच्याकडे तक्रार घेऊन येत आहेत. वीजबील माफी झालीच पाहिजे. लॉकडाउनमध्ये लोकांच्या नोकऱ्या गेल्या. चार-पाच महिन्यांपासून उद्योग, व्यवसाय बंद आहेत, तरीही महावितरण सरसकट बील काढून तसेच लॉकडाउन काळात युनिटचे दर 43 पैशाने वाढवून जनतेच्या जखमेवर मीठ चोळत आहे. जर यावर तत्काळ तोडगा काढून बील माफी किंवा बीलात सुट नाही दिली तर निवेदन देऊन गप्प बसणार नाही तर कार्यालयाच्या काचा फुटतील, हे लक्षात ठेवा, असा इशाराही देण्यात आला. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: light bill issue konkan sindhudurg