esakal | महावितरणला दिलासा; शेतकऱ्यांकडून 1,160 कोटींचा भरणा 

बोलून बातमी शोधा

light bill issue konkan sindhudurg

या योजनेतील सहभागासोबतच आपल्या ग्रामपंचायत व जिल्हा क्षेत्रातील कृषी वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणासाठी तब्बल 773 कोटींचा हक्काचा 66 टक्के निधी देखील हे शेतकरी मिळविणार आहेत.

महावितरणला दिलासा; शेतकऱ्यांकडून 1,160 कोटींचा भरणा 
sakal_logo
By
राजेश सरकारे

कणकवली (सिंधुदुर्ग) - कृषिपंप वीज धोरण 2020च्या अंमलबजावणीमुळे गावागावांमध्ये वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीची ओढ सुरू झाली आहे. थकबाकीमध्ये तब्बल 66 टक्‍क्‍यापर्यंत सवलत मिळवित कालपर्यंत 11 लाख 96 हजार 184 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला असून 1,160 कोटी 47 लाख रुपयांचा भरणा केल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली. 

या योजनेतील सहभागासोबतच आपल्या ग्रामपंचायत व जिल्हा क्षेत्रातील कृषी वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणासाठी तब्बल 773 कोटींचा हक्काचा 66 टक्के निधी देखील हे शेतकरी मिळविणार आहेत. दरम्यान, राज्यातील 2 लाख 87 हजार 64 शेतकऱ्यांनी चालू वीजबिलांसह सुधारित मूळ थकबाकीपैकी 50 टक्के रकमेचा भरणा करून कृषीपंपाच्या वीजबिलांतून 100 टक्के थकबाकीमुक्ती मिळविली आहे.

उल्लेखनीय म्हणजे कोल्हापूर परिमंडलातील 52, बारामती परिमंडलातील 13 आणि नागपूर परिमंडलातील एका गावाने घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीचे चालू व थकीत वीजबिलांची संपूर्ण रक्कम भरून अख्खे गावच थकबाकीमुक्त करण्याचा इतिहास घडविला आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 6 गावांतील सर्व 135 शेतकऱ्यांनी कृषीपंपाच्या थकबाकीचा भरणा करून संपूर्ण गावाला 100 टक्के थकबाकीमुक्त केले आहे. 

कृषिपंप वीज धोरण 2020च्या अंमलबजावणीमुळे गावागावांमध्ये वीजबिलांतून थकबाकीमुक्त होण्याची स्पर्धा आता वेग घेताना दिसत आहे. राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकारातून वीजबिलांच्या वसुलीमधील तब्बल 66 टक्के रकमेचा निधी हा संबंधित ग्रामपंचायत व जिल्ह्यातील कृषी वीजयंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी वापरण्यात येणार आहे. या महत्वाच्या तरतुदीमुळे या थकबाकीमुक्तीला विशेष प्राधान्य देण्यात येत आहे. मागील वर्षी 1 एप्रिल 2020 पासून जमा होणाऱ्या वसुलीच्या रकमेची कृषी आकस्मिक निधी म्हणून स्वतंत्र नोंद ठेवली जात आहे. 

कृषी आकस्मिक निधीमध्ये चालू व थकीत वीजबिलांच्या भरण्यातून आतापर्यंत एकूण 1160 कोटी 34 लाख रुपये जमा झाले आहेत. त्यापैकी 66 टक्के रक्कम म्हणजे तब्बल 773 कोटींचा निधी संबंधित ग्रामपंचायत व जिल्ह्यातील कृषी वीजयंत्रणेच्या विविध कामांसाठी वापरणार आहेत. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे अभिनंदन केले असून शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्तीसह ग्रामपंचायत व जिल्ह्यातील वीजविषयक विकासासाठी गावकऱ्यांनी यापुढेही सकारात्मक भुमिका घ्यावी, असे आवाहन केले आहे. 

अनेक ठिकाणी कामे सुरू 
ग्रामपंचायत व जिल्ह्यातील नवीन उपकेंद्र, वितरण रोहित्र, वीजजोडण्या, कृषी वाहिन्यांच्या कामांसाठी आतापर्यंत पुणे प्रादेशिक विभागात 441 कोटी 8 लाखांचा निधी जमा झाला आहे. कोकण प्रादेशिक विभागात 223 कोटी 91 लाख, औरंगाबाद विभागात 96 कोटी 16 लाख आणि नागपूर विभागात 67 कोटी 38 लाखांचा निधी जमा झाला आहे. या निधीच्या वापरासाठी संबंधित ग्रामंपचायत व जिल्ह्यातील वीजविषयक विविध कामांचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे तर अनेक ठिकाणी कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. 

संपादन - राहुल पाटील