अजब! तब्बल 14 वर्षांच्या संघर्षानंतर घरात वीज 

प्रभाकर धुरी
Wednesday, 2 December 2020

अखेर ग्रामपंचायत सदस्य महेश लोंढे आणि गवस यांनी भाजपाचे तत्कालिन तालुकाध्यक्ष दळवी यांच्या कानावर ती गोष्ट घालून वीजपुरवठा करण्याची विनंती केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घर तेथे वीज जोडणी या योजनेतून वीजजोडणी देण्याचा प्रस्ताव तयार केला.

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) - वीज ही प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यावश्‍यक गोष्ट; पण भाऊबंदकी आणि राजकीय सुंदोपसुंदीने एखाद्या कुटुंबाला वर्षानुवर्षे विजेपासून वंचित ठेवले तर? होय, अशी घटना दोडामार्ग तालुक्‍यातील कोनाळ गावात घडलीय. कोनाळ गवसवाडी येथील उदय गवस यांच्या कुटुंबाला तब्बल 14 वर्षे काळोखात काढावी लागली. भाजपचे तत्कालीन तालुकाध्यक्ष सुधीर दळवी आणि ग्रामपंचायत सदस्य महेश लोंढे यांनी पुढाकार घेतल्याने त्या कुटुंबाचा 14 वर्षांचा वनवास संपला आणि घरातील दिवे पेटले. चौदा वर्षानंतर त्या कुटुंबाने खरीखुरी दिवाळी अनुभवली. 

कोनाळ-भरडोंगरवाडी तिलारी प्रकल्पामुळे बाधित झाली. अनेक कुटुंबे विस्थापित झाली. त्यात गवस यांचेही कुटुंब होते. तिलारी पाटबंधारे खात्यामध्ये ते पर्जन्यजल मोजमाप केंद्रात कार्यरत आहेत. विस्थापित झाल्यानंतर त्यांनी भावाकडील पाच गुंठे जमीन घेवून घर बांधले; पण त्यांना विजजोडणी मात्र मिळाली नव्हती. त्यातच त्यांची वैभववाडीला बदली झाली आणि सगळा भार पत्नीवर पडला. त्यांची दोन मुले, एक मूल चौथीत तर एक सहावीत होते. घरात लाईट नसल्याने मुलांना दिव्याच्या प्रकाशावर अभ्यास करावा लागे; पण रॉकेल मिळत नव्हते. त्यामुळे त्यांची फरफट व्हायची. अशी चौदा वर्षे गेली. काळोखात अभ्यास करुन मुलांनी दहावी, बारावी आणि पदवी परीक्षाही दिली. 

अखेर ग्रामपंचायत सदस्य महेश लोंढे आणि गवस यांनी भाजपाचे तत्कालिन तालुकाध्यक्ष दळवी यांच्या कानावर ती गोष्ट घालून वीजपुरवठा करण्याची विनंती केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घर तेथे वीज जोडणी या योजनेतून वीजजोडणी देण्याचा प्रस्ताव तयार केला. काम सुरूही झाले; पण भाऊबंदकी आणि राजकारण आडव आलं. अनेकांनी त्यांचे काम रोखण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे जिथे दोन खांब लागणार होते तिथे पंधरा खांब घालून वीज आणावी लागली. त्यासाठी बांदेकर कुटुंबीय आणि केरळीयन श्री. साजी यांनी सहकार्य केले. 

...अन्‌ दिवाळी साजरी 
शिवाय साटेली भेडशी सरपंच लखू खरवत, उपसरपंच सूर्यकांत धर्णे, कुडाळचे कार्यकारी अभियंता श्री. लोकरे, दोडामार्गचे उपकार्यकारी अभियंता रवींद्र देहारे व अतुल पाटील, साटेली भेडशीचे शाखा अभियंता जीवन चराटे आदींनी खूप सहकार्य केले. त्यामुळे या दिवाळीत त्यांच्या घरात वीज पोचली आणि चौदा वर्षांचा वनवास संपला. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: light issue konal village dodamarg taluka