वीज उपकेंद्र उशाला, तरीही गावभर अंधार, ग्रामस्थांना मनस्ताप

रुपेश हिराप
Monday, 10 August 2020

निवेदनात म्हटले आहे की, माजगावातील ग्रामस्थांच्या व ग्राहकांच्यावतीने वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार होत आहेत.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - माजगाव - उद्यमनगर येथे विद्युत पुरवठा करणारे उपकेंद्र कार्यान्वित केले आहे. या उपकेंद्रावरून परिसरातील गावांना विद्युत पुरवठा करण्यात येतो. उपकेंद्र नसताना माजगावमध्ये विद्युत पुरवठा सुरळीत चालत होता; मात्र आता विद्युत पुरवठा उपकेंद्र असतानाही माजगाव येथे वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार होत आहेत. ही समस्या लवकरात लवकर मार्गी लावाव्या, अशा आशयाचे निवेदन माजी सभापती तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी इतरांच्या उपस्थितीत अभियंता यांना निवदेन दिले. 

निवेदनात म्हटले आहे की, माजगावातील ग्रामस्थांच्या व ग्राहकांच्यावतीने वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार होत आहेत. माजगाव गावांमध्ये उद्योग व्यवसाय व गावासाठी उपकेंद्र असून प्राधान्याने उद्यमनगरमधील व्यवसाय व माजगाव गावासाठी विद्युत पुरवठा करणे आवश्‍यक आहे. असे असतानाही माजगावमध्ये वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार होत आहेत. माजगाव वीजपुरवठ्यापासून वंचित ठेवून अन्य विभागामध्ये या उपकेंद्रामार्फत विद्युत पुरवठा करण्यात येत आहे.

गेल्या आठ दिवसात विद्युत पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार होत असून कार्यालयाकडून या प्रकारची कोणतीही कार्यवाही केली नाही. याचा मनस्ताप ग्रामस्थ व सर्व ग्राहकांना होत आहे. ग्रामस्थ व ग्राहकांची ही कुचेष्टा चाललेली असून याबाबत संतप्त भावना व्यक्त करण्यात येत आहेत. लवकरात लवकर समस्या दूर करून वीजपुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलन करावे लागेल. अशा आशयाचे निवेदन श्री. दळवी यांनी दिले आहे. याबाबतची प्रत त्यांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि कुडाळ येथील कार्यकारी अभियंता यांना पाठवली आहे. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: light problem in majgao konkan sindhudurg