रत्नागिरी काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या भेटीगाठी सीसीटीव्हीत कैद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मे 2019

चिपळूण - ‘काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी कुडाळमध्ये कोणाच्या, कधी व कुठे भेटीगाठी घेत पक्षाशी गद्दारी केली, याचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहेत. गद्दारीच्या सर्वच गोष्टी उघड करायला भाग पाडू नका,’ असा इशारा माजी उपनगराध्यक्ष लियाकत शाह यांनी येथे पत्रकार परिषदेत दिला.

चिपळूण - ‘काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी कुडाळमध्ये कोणाच्या, कधी व कुठे भेटीगाठी घेत पक्षाशी गद्दारी केली, याचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहेत. गद्दारीच्या सर्वच गोष्टी उघड करायला भाग पाडू नका,’ असा इशारा माजी उपनगराध्यक्ष लियाकत शाह यांनी येथे पत्रकार परिषदेत दिला.

ते म्हणाले, ‘‘आपण गेल्या १० ते १२ वर्षांपासून काँग्रेसमध्ये सक्रिय असून पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ता आहोत. पालिकेत कार्यरत असताना भ्रष्टाचार केला नाही. काँग्रेस प्रवक्ते वासुदेव मेस्त्रींनी खोटेनाटे आरोप करून निवडणुकीत झालेल्या गद्दारीच्या मुद्द्याला बगल देऊ नये. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश कदम यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षाशी गद्दारी केली. समर्थक कार्यकर्त्यांसह शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांपर्यंत प्रचार साहित्य जाणीवपूर्वक पोहोचू दिले नाही. जिल्हाध्यक्षांनीच दुसऱ्याच पक्षाचा प्रचार केल्याने त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी केली.’’ 

शाह भ्रष्टाचारी आहेत. त्यामुळे त्यांनी जिल्हाध्यक्षांवर खोटेनाटे आरोप करू नयेत. त्यांचीच पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते वासूअप्पा मेस्त्री यांनी केली होती. शाह यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या बाबी त्यांनी प्रसिद्धी पत्रकातून नमूद केल्या होत्या.

त्याला प्रत्युत्तर देताना शाह म्हणाले, ‘‘पक्षाचे तालुका प्रवक्ते निवडणुकीत झालेल्या गद्दारीला जाणीवपूर्वक बगल देत आहेत. कोणी-कोणी पक्षाचे प्रामाणिकपणे काम केले, ते जाहीर करावे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष सात एप्रिलला कुडाळमध्ये होते. तेथे त्यांनी दुपारी १ ते ३ दरम्यानच्या कालावधीत कोणा-कोणाशी गुप्त चर्चा केली, याची सीसीटीव्ही फुटेजमध्ये नोंद आहे.

जिल्हाध्यक्षांनी शहर तसेच ग्रामीण भागात प्रचारासाठी कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या नाहीत. पक्षाचे उमेदवार बांदिवडेकर यांच्या प्रचारासाठी यंत्रणा राबवली नाही. उलट यंत्रणा खिळखिळी करून दुसऱ्या पक्षाचा प्रचार केला. पक्षाशी कोणी गद्दारी केली, हे कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांना चांगलेच ठावूक आहे. जिल्हाध्यक्षांनी केलेल्या गद्दारीचे अजून भरपूर पुरावे उपलब्ध आहेत. योग्यवेळी ते पक्षाच्या वरिष्ठांपुढे मांडू.’’
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Likayat Shah accusation on Ratnagiri District congress president