कोयना धरणातून वीजनिर्मितीवर मर्यादा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 मे 2019

एक नजर

  • कोयना धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे वीजनिर्मितीवर मर्यादा
  • कोयना धरणातील १०० टीएमसी पाण्याचा प्रथमच वीजनिर्मिती व सिंचनासाठी वापर.
  • सद्यःस्थितीत केवळ १४ टक्के पाणीसाठा शिल्लक
  • पाऊस लांबल्यास वीजनिर्मितीवर परिणाम होण्याची शक्‍यता.
  • सिंचन व वीजनिर्मितीसाठी सोडण्यात येणारे पाणी कपात करण्याचा धरण व्यवस्थापनाचा निर्णय. 

चिपळूण - कोयना धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे वीजनिर्मितीवर मर्यादा आली आहे. राज्यात जास्त मागणी असलेल्या कालावधीत आवश्‍यकतेनुसार प्रकल्पातून वीजनिर्मिती केली जात आहे. कोयना धरणातील १०० टीएमसी पाण्याचा प्रथमच वीजनिर्मिती व सिंचनासाठी वापर करण्यात आला. त्यामुळे धरणात खडखडाट झाला आहे. सद्यःस्थितीत केवळ १४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस लांबल्यास त्याचा परिणाम वीजनिर्मितीवर होण्याची शक्‍यता आहे. सिंचन व वीजनिर्मितीसाठी सोडण्यात येणारे पाणी कपात करण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनाने घेतला आहे. त्याबाबतचे पत्र महानिर्मिती कंपनीला देण्यात आले आहे. 

१०५.२५ टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणाऱ्या कोयना धरणातील पाण्याचे वाटप कृष्णा पाणी वाटप लवादाच्या निर्देशानुसार केले जाते. ६७.५० टीएमसी पाणीसाठा पश्‍चिमेकडील वीज प्रकल्पासाठी, तर ४० टीएमसी पाणीसाठा पूर्वेकडील सिंचनासाठी देण्यात येतो. धरणातून आतापर्यंत ३७.५ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे.

धरणाच्या पायथा वीजगृहातून २१००, धरणाच्या आपत्कालीन विमोचक्र दरवाजातून १,००० असे एकूण ३,१०० क्‍यूसेक पाणी दररोज देण्यात येते. पायथा वीजगृहातून आतापर्यंत ३३.३९ टीएमसी, तर आपत्कालीन विमोचक्र दरवाजातून ४.११ असा ३७.५ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे.

पश्‍चिमेकडील वीज प्रकल्पासाठी कोयना प्रकल्पाने तयार केलेल्या पाणीवाटप आराखड्यानुसार ६६.२ टीएमसी पाणी प्रस्तावित केले आहे. महानिर्मिती कंपनीने ६१.९४ टीएमसी पाण्याचा वापर करून ४.०८ टीएमसी पाणीसाठ्याचा वापर शिल्लक ठेवला आहे. पूर्वेकडे व पश्‍चिमेकडे धरणातून पूर्णक्षमतेने पाणी वापर होत असल्याने धरणाची पाणी पातळी खालावली आहे. धरणात १९.५१ टक्के पाणीसाठा असून त्यातील १४.३९ टीएमसी पाणीसाठा उपयुक्त आहे. ३१ मेपर्यंत धरणातील पाणी सोडण्यात यावे,अशी सूचना सांगली पाटबंधारे विभागाने केली आहे. 

कोयना धरणात पाण्याची कमतरता आहे.त्यामुळे वीजनिर्मितीसाठी पूर्ण क्षमतेने पाणी सोडता येणार नाही. पाण्याचे नियोजन न झाल्यास वीजनिर्मिती बंद करण्याचा धोका आहे. याबाबतची सूचना महानिर्मिती कंपनीला पत्राद्वारे देण्यात आली आहे.
- वैशाली नारकर,
अधीक्षक अभियंता, कोयना सिंचन मंडळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Limit on electricity manufacture from Koyna dam