रत्नागिरी जिल्ह्यातील एवढ्या शेतकऱ्यांना मिळाली कर्जमाफी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

आज रत्नागिरी जिल्ह्यातील केवळ 234 शेतकऱ्यांची नावे कर्जमाफीच्या यादीत आहेत. कोकणातील आंबा, काजू, सुपारी बागायदार आणि मच्छीमारांसाठीही वेगळे निकष लावून लाभ मिळवून देण्याची आवश्‍यकता आहे.

गुहागर : आज रत्नागिरी जिल्ह्यातील केवळ 234 शेतकऱ्यांची नावे कर्जमाफीच्या यादीत आहेत. कोकणातील आंबा, काजू, सुपारी बागायदार आणि मच्छीमारांसाठीही वेगळे निकष लावून लाभ मिळवून देण्याची आवश्‍यकता आहे. मात्र महाविकास आघाडीतील पक्षांना निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. राज्यात महिलांवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मजबूत विरोधी पक्षाचे कर्तव्य म्हणून सरकारला याचा जाब विचारण्यासाठी भाजपने राज्यव्यापी आंदोलन केले, अशी माहिती भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी पत्रकारांना दिली. 

हे पण वाचा - पोलिसांनी छत्रपती संभाजीराजेंनाच रोखले गेटवर अन्....

गुहागर तहसीलदार कार्यालयासमोर मंगळवारी (ता. 25) भाजप कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले. तत्पूर्वी पक्ष कार्यालय ते तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या वेळी उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू, गुहागर तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांच्यासह तालुक्‍यातील भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. 

आंदोलनानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. नातू म्हणाले की, लांबलेल्या पावसाचा फटका शेतकऱ्यांप्रमाणेच बागायदारांनाही बसला आहे. सुपारीचे उत्पन्न घटले आहे. आंब्याच्या उत्पन्नातही घट होणार आहे. आज महसूल विभागाने सर्व्हे केला तर उत्पन्नातील घट लक्षात घेऊन भरपाईची रक्कम ठरविता येईल. मच्छीमारांचीही परिस्थिती वेगळी नाही. पाऊस लांबल्याने मच्छीचे उत्पन्न कमी झाले आहे. सामान्य मच्छीमारांसमोर पर्ससीननेट व एलईडीने होणाऱ्या मच्छीमारीने आव्हान उभे केले आहे.

हे पण वाचा - हे बिस्कीट महादेव मंदिर तुम्ही पाहिलंय काय

बेकायदेशीर मच्छीमारीवरील कठोर कारवाईकडे राज्यसरकारचे दुर्लक्ष होत आहे. नव्याने स्थापन झालेले राज्यसरकार जनतेच्या उपयोगी योजना बंद करत आहे. याचा जाब विचारण्यासाठी भाजपने राज्यव्यापी आंदोलन छेडले. प्रत्येक ठिकाणचे स्थानिक प्रश्न घ्यावेत असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. मात्र प्रदेशने निश्‍चित केलेल्या दोन मुद्‌द्‌यांवरच आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही नातू यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loan waiver to 234 farmers in Ratnagiri district