रत्नागिरीत काँग्रेस भुवनला का लावले टाळे ?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 डिसेंबर 2019

जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. विजय भोसले यांच्या गटाने काँग्रेसभुवनला कुलूप लावल्याने रमेश कीर गटाची मोठी गोची झाली. सुमारे पाऊण तास त्यांना कार्यालयाबाहेर तिष्ठत उभे राहावे लागले.

रत्नागिरी - जिल्ह्यातील काँग्रेसच्या गटातटाच्या राजकारणाने आज टोक गाठले. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची परंपरा असलेल्या येथील काँग्रेस भुवनला चक्क टाळे लावल्याचे पाहण्याची वेळ काँग्रेसजनांवर आली. यामध्ये माजी जिल्हाध्यक्षांचाही समावेश आहे.

जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. विजय भोसले यांच्या गटाने काँग्रेसभुवनला कुलूप लावल्याने रमेश कीर गटाची मोठी गोची झाली. सुमारे पाऊण तास त्यांना कार्यालयाबाहेर तिष्ठत उभे राहावे लागले. कुरघोडीच्या राजकारणात प्रदेश सहसचिवांसह कार्यकर्त्यांना काँग्रेस भवनात प्रवेशच मिळाला नाही. यावर प्रतिक्रिया देण्यास जिल्हाध्यक्ष भोसले यांनी नकार दिला.

हेही वाचा - काँग्रेसचा व्हीप डावलून भाजपने मारली येथे बाजी 

दरवाज्यावर नोटीस

आज गटबाजीचा नवा प्रकार पुढे आला. एका गटाने जणू काँग्रेस भुवनवर कब्जा घेतला. दुसर्‍या गटाला ते वापरता येऊ नये, म्हणून काँग्रेस भुवनला टाळेच ठोकुन ठेवले. आज रमेश कीर गटाने काँग्रेसभुवन येथे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक घेण्याचा निर्णय घेतला होता. बैठकीसाठी सारी मंडळी काँग्रेस भुवनला आल्यानंतर दरवाजांना कुलुप असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरवाज्यावर नोटीस चिकटवलेली त्यांना पहायला मिळाली. ज्यांना काँग्रेस भवन पक्ष कार्यासाठी उघडे पाहिजे किंवा इतर तालुक्यातील कार्यकर्त्यांना हवे असल्यास त्यांनी कामाचे स्वरुप सांगुन चावी घ्यावी. चावी दीपक राऊत आणि बंडु सावंत यांच्याकडे असल्याचे नमुद केलेली ही नोटीस काँग्रेस जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. भोसले यांच्या नावाने आहे.

हेही वाचा - काँग्रेस-राष्ट्रवादीच्या या जि. प. सदस्यांची वर्षाखेर गोव्यात 

काँग्रेस पक्षाच्या इतिहासात 

नोटीस पाहिल्यावर कीर यांचा गट आणि बैठकीसाठी आलेले सारे हतबद्ध झाले. चावी मिळावी यासाठी निरोप पाठविण्यात आला होता. परंतु उशिरापर्यंत चावी घेऊन कोणीच आले नाही. त्यामुळे कीर यांचा गट माघारी फिरला. या गटाची बैठकच झाली नाही. असा प्रकार काँग्रेस पक्षाच्या इतिहासात रत्नागिरीत याआधी एकदाच झाला होता. तेव्हा दुसर्‍या गटाला चावी मिळाली नव्हती. त्यावर गदारोळ झाला होता.

रमेश कीर म्हणाले

काँग्रेस भुवन बंद का आहे, याची मला कल्पना नाही. पदाधिकार्‍यांची बैठक होती म्हणून आलो होतो. मात्र चावी नाही म्हणून आम्ही सर्व पाऊणतास बाहेर चावीसाठी उभे होतो मात्र अजून चावी आलेली नाही. हे असे चित्र आहे, सर्व काही छान चाललयं असे रमेश कीर उपरोधात्मक बोलले. जाणुनबुजून कुलुप लावले आहे. कार्यालय बंद करणे ही चुकीची पद्धत. रत्नागिरीत जबाबदार पदाधिकारी असताना हे योग्य नाही अशी संतप्त प्रतिक्रिया त्यानी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lock To Ratnagiri Congress Bhuvan Marathi News