esakal | कडक लॉकडाउनच्या शक्‍यतेने धास्ती वाढली 

बोलून बातमी शोधा

lockdown issue konkan sindhudurg

गतवर्षी मार्च महिन्यात लॉकडाउन जाहीर झाले होते. त्याचा प्रभाव डिसेंबर 2020 पर्यंत कायम राहिला. नव्या वर्षात निर्बंध शिथिल झाल्याने छोटे-मोठे व्यापारी, उद्योजक, व्यावसायिकांना काहीसा दिलासा मिळाला होता.

कडक लॉकडाउनच्या शक्‍यतेने धास्ती वाढली 
sakal_logo
By
राजेश सरकारे

कणकवली (सिंधुदुर्ग) - राज्यात पुन्हा एकदा कडकडीत लॉकडाउन लागू होणार असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. कोरोना रूग्णसंख्येचा वाढता आलेख पाहता हे लॉकडाउन मे-जूनपर्यंत राहण्याची शक्‍यता असल्याने छोटे व्यापारी, उद्योजक आणि त्या क्षेत्रातील कारागिरांची धास्ती वाढली आहे. लॉकडाउनच्या भीतीने कारागीर, कामगार आपापल्या गावी गेल्याने बांधकाम क्षेत्र पुन्हा ठप्प झाले आहे. 

गतवर्षी मार्च महिन्यात लॉकडाउन जाहीर झाले होते. त्याचा प्रभाव डिसेंबर 2020 पर्यंत कायम राहिला. नव्या वर्षात निर्बंध शिथिल झाल्याने छोटे-मोठे व्यापारी, उद्योजक, व्यावसायिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. अर्थव्यवस्थेचा गाडा पुन्हा रूळावर येत असताना राज्य सरकारने विकेंड लॉकडाउन जाहीर केले. हा विकेंड लॉकडाउन कडकडीत पाळला गेला. त्याच धर्तीवर आता पुन्हा तीन आठवड्यांचा लॉकडाउन जाहीर होण्याची शक्‍यता राज्य शासनाकडून व्यक्‍त केली जात आहे. त्यामुळे उद्योग, व्यावसायिक आणि त्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबांची चिंता वाढली आहे. 

विहिरींची कामे ठप्प 
जिल्ह्यात एप्रिल ते मे अखेर पर्यंत विहिरी खोदण्याची कामे सुरू होतात. गेल्या काही वर्षांत सिमेंट क्रॉंक्रिटच्या विहिरी बांधल्या जात आहेत. या विहिरींच्या खोदाईसाठी मध्यप्रदेश आणि छत्तीसगड येथील कारागीर आणले जातात. गेल्या वर्षी प्रमाणेच यंदाही लॉकडाउन होण्याची शक्‍यता असल्याने विहीर खोदाई करणारे कामगार माघारी परतले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील विहिरींची कामे ठप्प झाल्याचे विहीर व्यावसायिक भालचंद्र सावंत यांनी सांगितले. 

बांधकाम क्षेत्रही थांबले 
यंदा जानेवारीपासून बांधकाम क्षेत्रातील कामे पुन्हा सुरू झाली होती. शासनाकडून निधी वितरित झाल्याने रस्ते, पूल कामांनी वेग घेतला होता. तसेच गतवर्षी अर्धवट राहिलेले गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करण्यालाही बिल्डर्सनी प्राधान्य दिले होते; मात्र लॉकडाउनच्या शक्‍यतेने या बांधकाम क्षेत्राशी निगडित असलेले परप्रांतीय कामगार आपापल्या घरी जाऊ लागले आहेत. यात पुन्हा एकदा बांधकाम क्षेत्र ठप्प झाल्याची खंत बांधकाम व्यावसायिक भिवा राणे यांनी व्यक्‍त केली. 

वाहतूक व्यवसायही ठप्प 
यंदा दिवाळीनंतर जिल्ह्यात पर्यटकांचा राबता सुरू झाला. मार्च पासून तर पर्यटकांची संख्या वाढू लागल्याने वाहतूक व्यवसायालाही चांगले दिवस येऊ लागले होते. तसेच लग्नसराईसाठीही गाड्यांची आगावू बुकिंग होत होती. आता कोरोना प्रतिबंध आणखी कडक होणार असल्याचा सर्वाधिक फटका वाहतूक व्यवसायाला बसणार असल्याचे वाहतूक व्यावसायिक उत्तम राणे यांनी सांगितले. गतवर्षी कोरोनामुळे वाहनांवरील कर्जाचा बोजा कायम राहिला होता. यंदाही तशीच परिस्थिती असून वाहतूक क्षेत्राला भवितव्यच नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. 

हॉटेल क्षेत्रावरही मंदीचे सावट 
कणकवली शहरात उड्डाणपूल खुला झाल्याचा सर्वाधिक फटका हॉटेल क्षेत्राला बसला. त्यात पुन्हा लागू होणाऱ्या लॉकडाऊनमध्ये हॉटेल व्यवसाय बंद ठेवावे लागणार आहेत. त्यामुळे हॉटेल सुरू करण्यासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते, मोठ्या रक्‍कमेची लाइट बिले भरायची कशी आणि संसार चालवायचा कसा असा प्रश्‍न सतत भेडसावत असल्याचे हॉटेल व्यावसायिक संजय एकावडे म्हणाले. 

कामगारांपुढे पगार कपातीचे संकट 
छोटे मोठे व्यवसाय, उद्योग, दुकाने, आस्थापने या ठिकाणी पाच ते दहा हजार रुपयांच्या पगारावर शेकडोजण कार्यरत आहेत. लॉकडाऊनमध्ये हे सर्वच उद्योग बंद राहत असल्याचे या कामगारांना पगार कपातीचे संकट भेडसावत आहे. तर काही कामगारांना बेरोजगार होण्याचीही भीती आहे. 

जिल्ह्यातील कलिंगड व्यावसायिक दरवर्षी आंगणेवाडी, कुणकेश्‍वर यात्रेत 50 हजार ते दीड लाखापर्यंत व्यवसाय करतात. यंदा कोरोनामुळे हे दोन्ही मोठे यात्रोत्सव साधेपणे साजरे झाले. त्यामुळे कलिंगड उत्पादकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. त्यात आता पुन्हा कठोर लॉकडाउनची शक्‍यता आहे. त्यामुळे तयार कलिंगड फेकून द्यावी लागण्याची भीती आहे. 
- अनिल पेडणेकर, कलिंगड व्यावसायिक 

संपादन - राहुल पाटील