esakal | निर्बंधांत शिथिलता न आणल्यास उद्रेक ः तेली
sakal

बोलून बातमी शोधा

lockdown issue rajan teli press conference konkan sindhudurg

लॉकडाउनमुळे ज्यांचे रोजगार हिरावले गेले, ज्यांचा व्यवसाय बंद झाला त्या सर्वांना राज्य शासनाने पॅकेज द्यावे. तर बाजारपेठेतील दुकाने एक दिवसआड सुरू ठेवण्यासाठी परवानगी द्यावी, अशीही मागणी श्री. तेली यांनी केली.

निर्बंधांत शिथिलता न आणल्यास उद्रेक ः तेली

sakal_logo
By
राजेश सरकारे

कणकवली (सिंधुदुर्ग) - सध्याच्या लॉकडाउनमध्ये शिथिलता न आणल्यास छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांसह जनतेचा उद्रेक होईल आणि राज्य सरकारला परिस्थिती नियंत्रणात आणणे कठीण होईल, अशी भीती भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज व्यक्‍त केली. 

लॉकडाउनमुळे ज्यांचे रोजगार हिरावले गेले, ज्यांचा व्यवसाय बंद झाला त्या सर्वांना राज्य शासनाने पॅकेज द्यावे. तर बाजारपेठेतील दुकाने एक दिवसआड सुरू ठेवण्यासाठी परवानगी द्यावी, अशीही मागणी श्री. तेली यांनी केली. येथील भाजप कार्यालयात श्री. तेली यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यामध्ये राज्य सरकार अपयशी ठरल्याची टीका केली. जिल्ह्यातील परिस्थिती सांभाळण्याऐवजी पालकमंत्री उदय सामंत केवळ हेलिकॉप्टरने हवेत भराऱ्या मारत असल्याचे ते म्हणाले. 

श्री. तेली म्हणाले, ""कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या लॉकडाउनला कुणाचा विरोध नाही; पण परिस्थिती बघून निर्णय घ्यायला हवेत. अत्यावश्‍यक वगळता इतर सर्वच दुकाने सरसकट बंद करण्याऐवजी एक दिवसआड दुकाने सुरू ठेवता येणे शक्‍य आहे. त्याबाबत व्यापाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढणं शक्‍य आहे; मात्र कुठलंच नियोजन नसल्याने हातावर पोट असणारी कुटुंबं रस्त्यावर आली आहेत. तर छोटे व्यापारी आणि विक्रेते यांच्यावरही उद्‌ध्वस्त होण्याची वेळ आली आहे.'' 

लॉकडाउनमुळे रिक्षा व्यावसायिक, स्टॉलधारक, कलाकार, छोटे व्यापारी आदी सर्वच मंडळी आर्थिक संकटात आली आहेत. त्यांना राज्य शासनाने पॅकेज द्यावे. केंद्र सरकार 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर करतं तर राज्य शासन सर्वसामान्यांना दिलासा का देत नाही, असाही प्रश्‍न श्री. तेली यांनी उपस्थित केला. 

पालकमंत्र्यांच्या घोषणा हवेत 

सिंधुदुर्गच्या प्रशासनात सध्या गोंधळाचे वातावरण आहे. कुणाचा पायपोस कुणाला नाही. सरकारी अधिकारी सर्वसामान्यांची कामे करत नाहीत. या सर्वांवर पालकमंत्र्यांनी नियंत्रण ठेवायला हवे; पण ते महिन्यातून एकदा हेलिकॉप्टरने सिंधुदुर्गात येतात. एक - दोन बैठका घेतात आणि निघून जातात, अशी टीका तेली यांनी केली. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला एक रुग्णवाहिका देण्याचेही आश्‍वासन त्यांनी दिले होते; पण त्यांच्या हवेतील भराऱ्यांप्रमाणे ही घोषणा देखील हवेतच विरल्याची टीका तेली यांनी केली. 

संपादन - राहुल पाटील

loading image